Home पिंपरी चिंचवड सायबर क्राईमवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: कोट्यवधींच्या फसवणुकीचा पर्दाफाश!

सायबर क्राईमवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: कोट्यवधींच्या फसवणुकीचा पर्दाफाश!

शेअर बाजारातून फसवणूक, डेटिंग ॲपवरून लाखोंचा गंडा आणि डिजिटल अरेस्टचे मोठे रॅकेट; 'क्रिप्टोकरन्सी'द्वारे परदेशात पैसे पाठवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची धडक कारवाई: ५ दिवसांत ११ आरोपी जेरबंद, २.११ कोटींची सायबर फसवणूक उघडकीस!

‘डिजिटल अरेस्ट’ ते ‘लग्नाचे आमिष’, विविध प्रकारच्या फसवणुकीचा पर्दाफाश; देशभरातून आरोपींना अटक!

पिंपरी, १७ जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली असून, अवघ्या पाच दिवसांत तब्बल २ कोटी ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ११ आरोपींना अटक केली आहे. डिजिटल अरेस्ट, शेअर बाजार गुंतवणुकीचे आमिष आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन होणाऱ्या फसवणुकीसारख्या विविध प्रकारच्या सायबर गुन्हेगारीचा या कारवाईमुळे पर्दाफाश झाला आहे. सिल्वासा (दादरा नगर हवेली), सोलापूर, धाराशिव, अहमदनगर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा विविध ठिकाणांहून या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.


स्टॉक मार्केट फसवणूक: सिल्वासा येथून ४ आरोपींना अटक

सायबर पोलीस ठाणे गु.र.क्र. २३/२०२५ मधील एका प्रकरणात, फिर्यादींना वेगवेगळ्या व्हॉट्सॲप नंबरद्वारे संपर्क साधून स्वतःला स्टॉक मार्केटचे तज्ज्ञ भासवण्यात आले. http://t.me/EMCEE667 या प्लॅटफॉर्मवरून आयपीओ खरेदी केल्यास मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विविध बँक खात्यांमध्ये ३ लाख ३० हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली होती.

फसवणुकीची रक्कम बंधन बँक आणि युको बँकेच्या खात्यांमध्ये जमा झाली होती. त्यापैकी २ लाख १० हजार रुपये बंधन बँकेच्या सिल्वासा, दादरा अँड नगर हवेली येथील खात्यात जमा झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सायबर पथकाने तात्काळ सिल्वासा येथे धाव घेऊन खातेधारक सलमान रफिक खान (वय ३२, रा. सिल्वासा) याला अटक केली. चौकशीत हा गुन्हा त्याने सुरज राठोड आणि बंटी पांचाळ यांच्यासोबत केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुन्हा पाठवलेल्या पथकाने आरोपी बंटी रमेशभाई पांचाळ (वय ३०, रा. सिल्वासा), इंतकाफ इद्रीस खान (वय ३६, रा. सिल्वासा) आणि सुरज कृष्णा सिंग (वय ३४, रा. सिल्वासा) यांना अटक केली.


‘लग्नाचे आमिष’ दाखवून दीड कोटींची फसवणूक: सोलापूर-पुणे येथून ३ आरोपी जेरबंद

सायबर पोलीस ठाणे गु.र.क्र. १३/२०२५ मधील एका गंभीर गुन्ह्यात, फिर्यादींना ‘Truly Madly’ या डेटिंग ॲपवर ‘अनामिका’ नावाच्या महिलेने ओळख करून लग्न करण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यानंतर भविष्यात घर खरेदी आणि ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १ कोटी ५५ लाख ३७ हजार रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.

या गुन्ह्यातील कोटक बँकेचा खातेधारक अमित अशोक एकबोटे सोलापूर शहरात असल्याची माहिती मिळाल्याने सायबर पथक तातडीने सोलापूरला रवाना झाले. अमित एकबोटे याच्याकडे चौकशी केली असता, आरोपी स्वप्नील बाहेती आणि शुभम मंथा यांनी त्याला गेमिंगसाठी खाते वापरले जाईल असे सांगून ते घेतले होते, आणि त्यावर सायबर फसवणुकीतील पैसे पाठवले असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, आरोपी शुभम मंथा आणि प्रक्षित हे चीनमधील सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याचेही उघड झाले. शुभम मंथा ‘Holyie’ नावाच्या चीनी कंपनीसोबत काम करत असल्याचेही निदर्शनास आले. पाटणा मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना, आरोपी शुभम चंद्रकांत म्हंता (वय २५, रा. सोलापूर) आणि प्रशिक्षण उत्तम नवघरे (वय २६, रा. सोलापूर) यांना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच, सोलापूर येथून स्वप्नील चंदुलाल बाहेती (वय ३५, रा. सोलापूर) यालाही अटक करण्यात आली.


‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक आणि क्रिप्टोकरन्सी कनेक्शन: अहमदनगरमधून ४ आरोपींना अटक

सायबर पोलीस ठाणे गु.र.नं. २५/२०२५ मध्ये दाखल गुन्ह्यात फिर्यादींची ‘डिजिटल अरेस्ट’ च्या माध्यमातून ५२ लाख ५९ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात यापूर्वीच आकाश बाबासाहेब पठारे आणि अविनाश श्रीकांत तुंगार (दोघेही रा. बोल्हेगाव, अहमदनगर) यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत, पाहिजे असलेला आरोपी विशाल पालवे वेगवेगळ्या व्यक्तींकडून बँक खाती घेऊन त्यावर गुन्ह्यातील पैसे प्राप्त करत होता. तसेच, प्राप्त झालेले पैसे सीडीएम मशीनद्वारे पाठवून स्वतःच्या क्रिप्टो वॉलेटला ‘युएसडीटी’ (USDT) ही क्रिप्टोकरन्सी घेत असल्याचे निष्पन्न झाले. विशाल पालवे वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करत असल्याचेही समोर आले. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे ९ मोबाईल फोन, २३ विविध बँकेचे पासबुक, १८ विविध बँकेचे चेकबुक, ३५ डेबिट कार्ड, ६४०० रुपये रोख आणि एक नोटबुक असा एकूण १ लाख १६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.

फसवणुकीतील रोख रक्कम स्वीकारून त्याला युएसडीटी ही क्रिप्टोकरन्सी देणारे आरोपी अक्षय सदाशिव गळये (रा. अहमदनगर) आणि मयुर सुनील आनेचा (रा. अहमदनगर) यांचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपी क्रिप्टोकरन्सीद्वारे परदेशात पैसे पाठवत असल्याचे आणि आपली ओळख लपवण्यासाठी ‘डिसेंट्रलाईज्ड वॉलेट’ वापरत असल्याचे दिसून आले आहे. सायबर फसवणुकीतील रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे पुन्हा बाजारात आणली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे, पिंपरी-चिंचवड करत आहेत.


अथक परिश्रमातून सायबर पोलिसांचे मोठे यश!

पोलीस आयुक्त मा. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मा. डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. सारंग आव्हाड, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ मा. डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पौमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील आणि सायबर टीममधील पोलीस अंमलदार हेमंत खरात, अतुल लोखंडे, दीपक भोसले, श्रीकांत कबुले, नितेश बिच्चेवार, अमोल आरोटे, कृष्णा गवळी, स्वप्निल खणसे, प्रवीण शेळकंदे, महेश मोटकर, अभिजीत उकिरडे, मोनिका चितेवार, दिपाली चव्हाण, शुभागी ढोबळे, सरिता तुपे, ज्योती साळे, वैशाली बर्गे यांनी अथक परिश्रम घेऊन हे मोठे यश मिळवले आहे.

(संदिप डोईफोडे) पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पिंपरी-चिंचवड.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!