सनदी लेखापालांची संस्था देशाच्या विकासात योगदान देणारी – खासदार निलेश लंके
निगडीत ‘सीए दिन’ उत्साहात साजरा; ‘महाराष्ट्रात मराठीतूनच कामकाज व्हावे’ – खा. लंके यांचा आग्रह!
पिंपरी, दि. १ जुलै २०२५: सनदी लेखापालांची (Chartered Accountants – CA) संस्था ही देशाच्या आर्थिक विकासात फार मोठे योगदान देणारी आहे. तसेच, देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात मार्गदर्शन करणारी व महत्त्वाची भूमिका बजावणारी ही संस्था आहे, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. निगडी येथील ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) च्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘सीए दिन’ सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी आयसीएआयचे केंद्रीय माजी सदस्य डॉ. शिवाजी झावरे, प्रादेशिक कौन्सिलचे माजी सदस्य डॉ. अशोक पगारिया, इनरव्हील क्लब निगडी प्राईडच्या अध्यक्षा कमलजीत दुलत, आयसीएआयचे शाखाध्यक्ष सीए वैभव मोदी, उपाध्यक्षा सीए सारिका चोरडिया, सचिव सीए मनोज मालपाणी, खजिनदार सीए महावीर कोठारी, विद्यार्थी संघटना अध्यक्ष सीए धीरज बलदोटा, कार्यकारी सदस्य सीए शैलेश बोरे व सीए सचिन ढेरंगे आदी मान्यवर उपस्थित होते. लेखापाल क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. झावरे यांना यावेळी विशेष मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान सीएमआरएस आणि बिजसोल इंडिया यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या शिबिरात १५० जणांनी रक्तदान केले. प्रा. नीलिमा डुंगरवाल यांनी यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
‘महाराष्ट्रात मराठीतूनच कामकाज चालावे’ – खा. लंके यांचा आग्रह
खासदार लंके पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजी कमकुवत असूनही, ते अभ्यास करून सीए सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. ते म्हणाले, “मी स्वतः इंग्रजीतून खासदारकीची शपथ घेतली, कारण इंग्रजी ज्ञानभाषा असून बहुतांशी देशवासियांना समजते. मात्र, महाराष्ट्रात मराठीतूनच कामकाज चालावे, असा आमचा आग्रह आहे.”
सीए पेशाचे महत्त्व आणि संधी
डॉ. शिवाजी झावरे म्हणाले की, सीए संस्थेच्या स्थापनेला ७७ वर्षे झाली असून, देशाने अनेक बदल अनुभवले आहेत. सीए संस्था समाज विकासात योगदान देत आहे. सीएचा अभ्यास पूर्ण करून उत्तीर्ण झालेले सनदी लेखापाल कधीही बेरोजगार राहू शकत नाहीत, कारण सीए प्रोफेशनला जगात कुठेच मरण नाही. सीए झालेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्रामध्ये, गुंतवणूक क्षेत्रामध्ये, संगणक क्षेत्रामध्ये आणि इतर अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये सुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत.
डॉ. अशोक पगारिया यांनी या ७७ वर्षांमध्ये फक्त चार लाख चार्टर्ड अकाउंटंट घडले आहेत, यावरून ही परीक्षा किती कठीण आहे, याची कल्पना येते, असे सांगितले. हा अभ्यासक्रम अतिशय सखोल अभ्यास करून केलेला असल्यामुळे सनदी लेखापालांना आर्थिक क्षेत्रातले मार्गदर्शक, आर्किटेक्ट आणि डॉक्टर सुद्धा संबोधले जाते. व्यवसायाच्या विकासासाठी सीएच्या सल्ल्याची आवश्यकता असते, कारण आर्थिक नियोजन क्षेत्रामध्ये, ऑडिटच्या क्षेत्रामध्ये आणि अकाउंटिंगच्या क्षेत्रामध्ये सीएचा सल्ला अतिशय महत्त्वाचा मानला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या जैन आणि प्राजक्ता जोशी यांनी केले, तर आभार सीए मनोज मालपाणी यांनी मानले.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
