‘शहरातील रस्त्यांचा विकास केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसावा; तो सर्वसमावेशक हवा!’ – आयुक्त शेखर सिंह
विविध महानगरांच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेस भेट; ‘शाश्वत शहरी गतिशीलता’ परिषदेचे आयोजन!
पिंपरी, दि. २ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड शहर हे वेगाने विकसित होणाऱ्या महानगरांपैकी एक असून, येथील नागरी समस्यांवर दीर्घकालीन आणि समतोल उपाययोजना राबवण्यावर महापालिकेचा भर आहे. शहरामध्ये केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढ्यावर रस्त्यांचा विकास मर्यादित न ठेवता, त्या जागा सर्वांसाठी सुयोग्य, सुरक्षित आणि सर्वसमावेशक व्हाव्यात यासाठी एक व्यापक दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘शाश्वत शहरी गतिशीलता’ या विषयावरील तीन दिवसीय परिषद व प्रशिक्षण सत्राचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे करण्यात आले आहे. या सत्राचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देशभरातील महत्त्वाच्या महानगरपालिकांचा सहभाग
या परिषदेला देशभरातील विविध महानगरपालिकांचे आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये लखनऊ महानगरपालिका आयुक्त गौरव कुमार, कानपूर महानगरपालिका आयुक्त सुधीर कुमार, अयोध्या महानगरपालिका आयुक्त जयेंद्र कुमार, सहारनपूर महानगरपालिका आयुक्त सिपू गिरी, उत्तर प्रदेश शहरी रस्ते विकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कुमार श्रीवास्तव, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांचा समावेश होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, अभिमान भोसले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी सुधीर बोरुडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध महानगरपालिकांचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

‘रस्ते फक्त वाहनांसाठी नाहीत, ते सर्वांसाठी असावेत!’
आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी आपल्या भाषणात रस्त्यांच्या पारंपरिक नियोजनावर भाष्य केले. ते म्हणाले, “रस्त्यांचे नियोजन करताना अनेकदा केवळ वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या सोयीवरच लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, रस्ते केवळ कार आणि दुचाकींसाठी नसतात. रस्त्यांवर पादचारी, सायकलस्वार, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दिव्यांग असे अनेक घटक असतात. या सर्व घटकांसाठी रस्ते सुरक्षित असणे हे आपल्या शहराच्या विकासातील मूल्यमापनाचे लक्षण आहे. म्हणूनच सर्व रस्त्यांना समान न्याय मिळणे गरजेचे आहे.”
फुटपाथ बांधणे किंवा रस्ते रुंद करणे हा फक्त एक भाग आहे. प्रत्यक्षात ‘अर्बन स्ट्रीटस्केप’ आणि ‘हरित सेतू’ सारखे उपक्रम हे शहरातील सार्वजनिक जागा अधिक आनंददायी, सक्रिय आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले. रस्त्यांवरील जागा चालणाऱ्यांसाठी, खेळणाऱ्या मुलांसाठी, सायकल चालवणाऱ्यांसाठी अशा प्रत्येकासाठी असायला हवी. या उपाययोजना केवळ सौंदर्यीकरणासाठी नव्हे, तर सर्वसमावेशकतेसाठी केलेल्या आहेत, असेही आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.
आर्थिक पाठबळ आणि भविष्यातील संकल्पना
शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महापालिकांनी नवे पर्याय शोधायला हवेत, असे मतही आयुक्त सिंह यांनी व्यक्त केले. ग्रीन बॉण्ड हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड महापालिकेने देशातील पहिला ग्रीन बॉण्ड उभारून २०० कोटी रुपये निधी उभारला असून, तो प्राधिकरण परिसरातील हरित सेतू प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. याशिवाय, कमी उत्सर्जन क्षेत्र (Low Emission Zone) सारख्या संकल्पनाही हळूहळू प्रत्यक्षात आणल्या जात आहेत. रस्त्यांकडे केवळ बांधकामाच्या दृष्टिकोनातून न पाहता, त्या जागा लोकांसाठी, पर्यावरणासाठी आणि शहराच्या भविष्यकालीन आरोग्यासाठी कशा उपयुक्त ठरतील, याचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये वास्तुविशारद प्रसन्न देसाई यांनी हरित सेतू, आयटीडीपीचे प्रांजल कुलकर्णी यांनी अर्बन स्ट्रीटस्केप, कनन विजय यांनी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, प्रतापसिंह भोसले यांनी रस्ते वाहतूक नियोजन, सर्वसमावेशक रस्ते रचना आणि विकास ठाकर यांनी बांधकाम नियोजन या विषयांवर आधारित प्रकल्पांची माहिती दिली.
विविध प्रकल्पांची अधिकारी वर्गाकडून पाहणी
या परिषदेनिमित्त आलेल्या विविध महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्ते रचना व एनएमटी (Non-Motorized Transport) प्रकल्पांसाठी तांत्रिक अनुभव विनिमय व अभ्यास दौऱ्यासाठी त्यांनी शहराच्या विविध भागांना भेटी दिल्या. यामध्ये मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पीसीसीओई पाटील रस्ता, हरित सेतू अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले काम, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पुनावळे चौक, सांगवी येथील रक्षक चौक, साई चौक आणि पिंपळे सौदागर येथील लिनिअर उद्यान या ठिकाणांचा समावेश होता. पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या तसेच सुयोग्य नियोजन करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती अधिकारी वर्गाने यावेळी जाणून घेतली.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
