पिंपरी-चिंचवडचे ‘विकास मॉडेल’ आता नाशिकमध्ये!
नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्रींकडून पिंपरी-चिंचवडच्या लोकोपयोगी प्रकल्पांची पाहणी; ‘कौशल्यम’, ‘सक्षमा’सह स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कौतुक!
पिंपरी, दि. ४ जुलै २०२५: देशात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराच्या विकास मॉडेलची दखल आता इतर महानगरपालिकांकडून घेतली जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात शहरात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांचे मॉडेल नाशिक महानगरपालिकेत राबवण्याचा मानस नाशिकच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला आहे. रस्ते रचना, एनएमटी प्रकल्प (नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्ट) आणि इतर तांत्रिक अनुभवाच्या अभ्यासासाठी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तीन दिवसीय दौऱ्यावर पिंपरी-चिंचवडला भेट दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
अभ्यास बैठकीत विविध प्रकल्पांची माहिती

या अभ्यास बैठकीला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, मनोज शेठीया, बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, ममता शिंदे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेकडून अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी, मुख्य अभियंता रवींद्र बागुल, संदेश शिंदे, शहर अभियंता संजय अगरवाल, मुख्य सल्लागार अनिकेत कुलकर्णी, सल्लागार प्राची देशमुख, दीपा मनोगुली, प्रतिक गोद्रे, शिवलीला अरोरा हे अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नाशिकच्या अधिकाऱ्यांना विविध शहरी उपक्रम आणि विकास कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने:
- सामाजिक भागीदारीतून रोजगाराच्या संधी देणारा ‘कौशल्यम’ प्रकल्प.
- महिलांना आर्थिक सक्षम करणारा ‘सक्षमा’ प्रकल्प.
- विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे फॉक्सबेरी संचलित ‘सीटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (CHDC)’ आणि ‘सीटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिस (CTO)’.
- दिव्यांग भवन फाउंडेशन.
- स्थापत्य, हरित सेतू, ग्रीन बॉण्ड, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (ICCC).
- शहरातील पुराच्या व गटारीच्या पाण्याचे नियोजन, बस स्थानक व त्यांचा वापर.
- स्वच्छ भारत मिशन, गार्डन पीपीपी, नवी दिशा, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प.
- पावसाळी पूरग्रस्त भागांतील पूल, जलशक्ती अभियान, स्वच्छ भारत अभियान.
- सीएसआर अंतर्गत सुरू असलेली कामे.
- सस्टेनेबिलिटी सेल, क्लायमेट बजेट, सोशल इम्पॅक्ट बॉण्ड, म्युनिसिपल बॉण्ड.
- इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, टीडीआर योजना, स्मार्ट स्ट्रीट, सौर ऊर्जा वापर.
- जल नियोजन, सीवरेज ट्रीटमेंट, ईआयसीसी सादरीकरण, रोड असेसमेंट मॅनेजमेंट सिस्टम.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि कौतुक

नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील थेरगाव येथील ‘बटरफ्लाय’ पूल, गुरुवर्य भोसरीकर माऊली तथा ज्ञानोबा भीमाजी लोंढे पादचारी पूल, वाकड येथील टीडीआर स्कीम, मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तसेच विविध ठिकाणी भेटी दिल्या. शहरात सुरू असलेल्या विकासकामांचे त्यांनी भरभरून कौतुक केले आणि असेच प्रकल्प नाशिक शहरात राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.
इतर महानगरपालिकांचाही अभ्यास दौरा
विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते रचना व एनएमटी प्रकल्पांसाठी तांत्रिक अनुभव व, विनिमय व अभ्यास या तीन दिवसीय दौऱ्याअंतर्गत लखनऊ महानगरपालिका, कानपूर महानगरपालिका, अयोध्या महानगरपालिका, सहारनपूर महानगरपालिका आणि उत्तर प्रदेश शहरी रस्ते विकास विभाग यांचेही आयुक्त व अधिकारी शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आले आहेत. पहिल्या दिवशी त्यांना शहरातील रस्त्यांचे नियोजन, अर्बन स्ट्रीटस्केप, हरित सेतू, ग्रीन बॉण्ड, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, रस्ते वाहतूक नियोजन, सर्वसमावेशक रस्ते रचना, बांधकाम नियोजन या विषयांवर आधारित प्रकल्पांची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली गेली.
त्यांनी शहरातील मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पीसीसीओई पाटील रस्ता, हरित सेतू अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेले काम, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पुनावळे चौक, सांगवी येथील रक्षक चौक, साई चौक, पिंपळे सौदागर येथील लिनियर उद्यान या ठिकाणी भेटी दिल्या. पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या आणि सुयोग्य नियोजन करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती या अधिकारी वर्गाने यावेळी घेतली.
आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रतिक्रिया:
मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका: “देशात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराकडे पाहिले जाते. येथील महानगरपालिका राबवत असलेल्या प्रकल्पांमुळे येथील नागरिकांना फायदा होताना दिसत आहे. असेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे लोकोपयोगी व पथदर्शी उपक्रम राबविण्याचा नाशिक महानगरपालिकेचा मानस राहील.”
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: “पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विविध लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नात असते. देश-विदेशातील महानगरपालिका अभ्यास दौऱ्यानिमित्त शहरात येत आहेत. यांतून शहराचे नाव उंचावत आहे. शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे समाधान आहे.”
पिंपरी-चिंचवडचे हे ‘विकास मॉडेल’ इतर शहरांसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे, हेच या भेटीतून सिद्ध झाले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
