news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडच्या विकासनगर-किवळेमध्ये स्वच्छतेचा बोजवारा: ‘डीप क्लिनिंग’ नाही, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू!

पिंपरी-चिंचवडच्या विकासनगर-किवळेमध्ये स्वच्छतेचा बोजवारा: ‘डीप क्लिनिंग’ नाही, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू!

खासदार निधीतील रस्त्यांची दुर्दशा, घंटागाड्यांचा सावळा गोंधळ; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रोगराईची भीती, तातडीच्या उपाययोजनांची मागणी. (© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

किवळे, विकासनगरमध्ये आरोग्य विभागाचे दुर्लक्ष: मार्चपासून ‘डीप क्लिनिंग’ रखडले, नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

 

 

खासदार निधीतून झालेल्या रस्त्यांवर मातीचे थर, पावसाळ्यात उगवले गवत; घंटागाड्यांचा भोंगळ कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे संताप!

 

किवळे, दि. ०५ जुलै २०२५ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ब प्रभागातील आरोग्य विभाग स्वच्छतेच्या बाबतीत पूर्णपणे उदासीन दिसत आहे. विकासनगर, किवळे येथील मीना कॉलनी आणि पेंडसे कॉलनी भागातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी येऊनही, मार्च महिन्यापासून ‘डीप क्लिनिंग’कडे आरोग्य विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, रोगराई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.


 

खासदार निधीतून झालेल्या रस्त्यांची दुरवस्था

 

खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार निधीतून या भागात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. मात्र, या रस्त्यांच्या बाजूला मातीचे थर आणि धुळधाण इतकी साचली आहे की, पावसाळ्यात तिथे चक्क झाडे उगवली आहेत. आरोग्य विभागाने ‘डीप क्लिनिंग’कडे दुर्लक्ष केल्याने रस्त्यांवर चालताना “खासदार निधीतून बनलेले रोड आहेत की चिखलातला रोड आहे?” असा प्रश्न महाराजा चौकाजवळच्या पाणी साचलेल्या ठिकाणी दिसून येत आहे. मुळात, हे डांबरीकरणाचे रस्ते चांगले असताना सिमेंट काँक्रिटीकरण का करण्यात आले, यावरही नागरिकांना उत्तर मिळालेले नाही. रस्ता झाल्यापासून त्या ठिकाणी पाणी साचत असते, मात्र अधिकाऱ्यांनी ब्लॉकची उंची कमी करून स्ट्रॉंग वॉटरमध्ये ढाळ काढण्याचाही प्रयत्न केला नाही.


 

कचरा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार

 

मीना कॉलनी आणि पेंडसे कॉलनी यांसारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेल्या आहेत. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांवर भोंगे नसतात, त्यामुळे कचरा गाडी आली की शाळेच्या मुलांना नेणारी गाडी आली यात देखील संभ्रम निर्माण होतो. हॉर्नचा आवाज देत गाड्या येतात, तर गाड्यांवर कचरा गोळा करण्याच्या भोंग्याचे म्युझिक दिले असतानाही असा गैरप्रकार अनेक वेळा आढळून येतो. अनेक वेळा कचरा पुन्हा न्यायला येतो म्हणून गाड्या दोन-दोन दिवस येत नाहीत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे परमनंट खाकी ड्रेस वाले कर्मचारी गायब झाले आहेत की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. काही ठिकाणी ठेकेदार/कॉन्ट्रॅक्टर कामगार दिसतात, मात्र तेही तुरळक प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी आरोग्य विभागावर ताशेरे ओढले जात आहेत.


 

मच्छर आणि आरोग्याची गंभीर समस्या

 

परिसरात मच्छरांचे प्रमाण वाढत असले तरी, महापालिकेची धुराडी दिसत नाहीत आणि रस्त्याच्या कडेला औषध फवारणीही केली जात नाही. अशा अनेक समस्या विकासनगर, किवळे, मीना कॉलनी, पेंडसे कॉलनी आणि संपूर्ण परिसरात दिसत आहेत.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी खाजगी जागेत आठवडी बाजार भरवला जातो, त्या खाजगी जागेची साफसफाई करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी लावतात. मात्र, प्रशासनाच्या ताब्यात असणारे रस्ते साफसफाई करण्याकडे ते दुर्लक्ष करतात. नागरिक या परिस्थितीने हैराण झाले असून, आरोग्य विभागाची स्वच्छतेची मोहीम फक्त कागदावरच असल्याची चर्चा आहे.

या सर्वांचे गंभीर परिणाम म्हणून नागरिकांमध्ये विविध आजारांची शक्यता वाढली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी याकडे गंभीरतेने पाहत नाहीत, त्यामुळे संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभाग, पालिका आयुक्त आणि पालिका वैद्यकीय व आरोग्य प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा, गंभीर समस्या निर्माण होण्याची वाट बघत राहणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!