अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना: ‘ब्लॅक स्पॉट’वर कायमस्वरूपी तोडगा काढणार!
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश; ‘गोल्डन अवर’मध्ये दीड लाखांपर्यंत मोफत उपचार, सुरक्षित प्रवासासाठी एकत्रित प्रयत्नांवर भर!
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे दि. ८ जुलै २०२५ (जिमाका): अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलिसांनी निश्चित केलेल्या १०० अपघात स्थळांची (ब्लॅक स्पॉट) यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून, या ठिकाणी अपघात होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत. यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा रस्ते सुरक्षा विषयक बैठक संपन्न:
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा रस्ते सुरक्षा विषयक’ महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यावेळी अधिक्षक अभियंता रूपा गिरासे, प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, कार्यकारी अभियंता श्री. गिरी आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले की, जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग यांच्यासह दुर्गम मेळघाटातील अरुंद रस्त्यांवरील अपघात रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका मुख्यालयातील अपघाताचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन, पोलीस आणि बांधकाम विभागाने एकत्रितरित्या उपाययोजना सुचविणे आणि त्यावर कार्य करणे गरजेचे आहे.
अपघात रोखण्यासाठी प्रमुख सूचना आणि उपाययोजना:
- स्पीडगनचा वापर: राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या गतीमुळे होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना होणे आवश्यक आहे. यासाठी स्पीडगनचा सक्षमपणे उपयोग व्हावा.
- दृष्यमानता खुली करा: पावसाळ्यात रस्त्यांच्या दुतर्फा येणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून रस्त्यांवरील दृष्यमानता खुली करावी. वन क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यांवर ही समस्या येत असल्याने बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही करावी. यामुळे समोरील येणारे वाहन दिसण्यास मदत होईल.
- मेळघाटात तातडीची मदत: मेळघाटात अपघात झाल्यास या ठिकाणी क्रेन आणि टोईंग वाहन येण्यास उशीर लागत असल्याने, परतवाडा येथे क्रेन आणि टोईंग वाहनाची व्यवस्था करावी.
- एजन्सी पॅनेलवर घ्या: तातडीने संपर्क आणि मदत पोहोचावी यासाठी या सेवा पुरविणाऱ्या एजन्सी पॅनेलवर घ्याव्यात. यामुळे त्यांची सेवा ऑनकॉल घेण्यास मदत होईल.
- माहिती अपलोड करा: अपघात झाल्यानंतर त्याची माहिती आयआरडीए (IRDA) यंत्रणेवर अपलोड करावी. यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांचे विश्लेषण करण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अपघातग्रस्तांवर दीड लाखांचा वैद्यकीय उपचार मोफत:
शासनाच्या नव्या निर्देशानुसार, अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये (अपघातानंतरचा पहिला महत्त्वाचा तास) तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी दीड लाखांपर्यंतचा वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहे. यासाठी सात दिवसांच्या आत क्लेम करावा लागणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून या खर्चाला मंजुरी दिल्यानंतर संबंधित रुग्णालयांना ही रक्कम देण्यात येणार आहे. यामुळे अपघातग्रस्तांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होईल.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
