कामगारांवर अन्यायकारक ४ श्रम संहिता रद्द करा: काशिनाथ नखाते
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात देशव्यापी संपात पिंपरी-चिंचवडमधील कामगार सहभागी; ‘विषमता वाढत आहे, कष्टकऱ्यांवर अन्याय थांबवा!’
पिंपरी, दि. ९ जुलै २०२५: केंद्र सरकार काही वर्षांपासून कामगार विरोधी धोरणे आणि कायदे आखत असून, त्याचा परिणाम देशभरातील कोट्यवधी कामगारांवर होत आहे. महागाईचे धोरण, बेरोजगारी वाढवणारी नीती आणि कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या चार श्रम संहिता (Labour Codes) आणल्या आहेत, ज्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी देशभरातील केंद्रीय संघटनांनी आज पुकारलेल्या बंदमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले, अशी माहिती कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली. कष्टकरी संघर्ष महासंघाने या संपाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला.
देशव्यापी संपात विविध कामगार घटकांचा सहभाग:
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार, घरगुती कामगार (घरेलू कामगार), कंत्राटी कामगार अशा विविध घटकातील कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील थरमॅक्स चौक, डांगे चौक, रहाटणी, निगडी, एमआयडीसी या ठिकाणी घोषणा देत कामगार मोठ्या उत्साहात संपात सहभागी झाले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, मनपा सदस्य सलीम डांगे, नंदू आहेर, सुनील भोसले, कालिदास गायकवाड, राजेंद्र कुटकर, प्रशांत मोरे, रमेश बंडगर, संदीप कांबळे, महादेव गायकवाड, निरंजन लोखंडे आदींसह अनेक कामगार उपस्थित होते.
नखाते यांचा सरकारवर हल्लाबोल आणि मागण्या:

नखाते म्हणाले की, देशभरातील संघटनांनी देशव्यापी संप पुकारलेला आहे. यात बँकिंग क्षेत्र, विमा क्षेत्र, टपाल क्षेत्र, कोळसा, खाणकामगार, वाहतूक, महामार्ग अशा विविध क्षेत्रातील कामगारांनी आपल्या हक्कासाठी हा बंद पुकारलेला आहे.
ते पुढे म्हणाले की, “केंद्र सरकारकडून मालक वर्गावर मेहेरनजर आणि कामगारांना देशोधडीला लावण्यासाठी ४ कामगार श्रम संहिता लादण्याचे प्रयत्न होत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विषमता वाढत आहे. कामगार चळवळ दडपण्याचे प्रयत्न केंद्र सरकार व राज्य सरकार करत असून, कामगारांचे हक्क हिरावून घेणे, कामाचे तास वाढवणे, तुटपुंजे पगार देणे आदी बाबींचा विरोध कामगार बांधव आता करत आहेत.”
“त्यांना काम मिळत नाही आणि मिळाले तरी पगार नीट मिळत नाही अशी स्थिती आहे. महागाईनुसार वेतन वाढ होणे गरजेचे असताना केवळ ठराविक लोकांना भरमसाठ पगार देण्यात येतो आणि खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगार वाऱ्यावर सोडण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. हे थांबले नाही, तर विधानभवनावरही आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा नखाते यांनी दिला.
महाराष्ट्रातील कामगार संघटना पुढील काळात एकत्र येऊन लढा देतील. महासंघातर्फे विविध ठिकाणच्या कामगारांना एकत्रित करून आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी घोषणा देत कामगारांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
