पालकमंत्र्यांकडील तक्रारींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी: नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश!
२० तक्रारींवर सविस्तर चर्चा, पर्यावरण शपथ ते मेळघाटातील वाघांचे हल्ले; जनतेचे जीवनमान सुकर करण्यासाठी प्रशासनाची तत्परता!
अमरावती, प्रतिनिधी- अविनाश वानखेडे दि. ११ जुलै २०२५ (जिमाका): अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विविध ठिकाणी नागरिकांनी सादर केलेल्या तक्रारी आणि निवेदनांवर आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सविस्तर सुनावणी घेतली. या बैठकीत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करून तातडीने कार्यवाही करण्यावर त्यांनी भर दिला.
पालकमंत्री कार्यालयातील तक्रारींवर थेट सुनावणी:
पालकमंत्री श्री. बावनकुळे आणि त्यांच्या कार्यालयात नागरिक भेटी देऊन समस्यांबाबत निवदेन सादर करतात. याच तक्रारींवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागाप्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देश असल्याने, थेट निर्देश देऊन नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
प्रमुख तक्रारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:

आज झालेल्या सुनावणीमध्ये एकूण २० तक्रारींवर चर्चा झाली. त्यापैकी काही प्रमुख तक्रारी आणि त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे:
- पर्यावरणाची शपथ: सर्व शाळांमध्ये पर्यावरणाची शपथ देण्यात यावी, यासाठी सर्व शाळांना निर्देश द्यावे.
- असदपूर बुडीत क्षेत्रातील व्यावसायिक: असदपूर बुडीत क्षेत्रातील व्यावसायिकांना मदत करून त्यांच्या व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागवावे.
- असदपूर-अमरावती बस सेवा: असदपूर-अमरावती बस सेवा नियमित सुरू करण्यासाठी विभाग नियंत्रकांना सूचना देण्यात येणार आहे.
- फ्रेजपुरा येथील अतिक्रमण: फ्रेजपुरा येथील अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची आवश्यकता आहे. त्यानुसार योग्यवेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- हनुमान मंडळासाठी जागा: हनुमान मंडळासाठी लीजवर जागा आवश्यक असल्याने त्यांनी नोंदणीकृत ट्रस्टद्वारे अर्ज करावा, यावर जिल्हास्तरावर गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
- मेळघाटातील वाघाचे हल्ले: मेळघाटातील वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू होत असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रभुदास भिलावेकर यांनी केली. याबाबत वन कायद्यानुसार सर्व परवानगी घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
- मेळघाटात अवैध धंदे: मेळघाटात अवैध धंद्यांवर तातडीने कार्यवाही करावी. आवश्यकता भासल्यास तडीपारीची कार्यवाही करावी. त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, असे निर्देश दिले.
- मेळघाटातील खासगी प्रवासी वाहतूक: मेळघाटातील खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेसची स्थिती प्रादेशिक परिवहन विभागातर्फे तपासण्यात येतील. यात आवश्यकतेनुसार कार्यवाही करण्यात येतील.
- आदिवासी आश्रमशाळा: आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
या सुनावणीमुळे नागरिकांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्रिय होतील अशी अपेक्षा आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
