news
Home अमरावती सामाजिक न्यायाचा नवा अध्याय: अमरावतीत तृतीयपंथीयांच्या दत्तक बाळाला लिंग प्रमाणपत्र, जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय!

सामाजिक न्यायाचा नवा अध्याय: अमरावतीत तृतीयपंथीयांच्या दत्तक बाळाला लिंग प्रमाणपत्र, जिल्हाधिकाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय!

एचआयव्ही, स्थलांतरित कामगारांसह संवेदनशील घटकांना सामाजिक सुरक्षा देण्याचे आवाहन; सर्व प्रशासकीय विभागांना सतर्कतेचे निर्देश. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

संवेदनशील घटकांसाठी सर्व विभागांनी सचेत राहावे: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन!

तृतीयपंथीयांच्या दत्तक बाळाला लिंग प्रमाणपत्र सुपूर्द; एचआयव्ही संक्रमित व्यक्ती, स्थलांतरित कामगारांच्या सामाजिक सुरक्षेवर भर!

अमरावती, प्रतिनिधी- अविनाश वानखेडे दि. १५ जुलै २०२५ (जिमाका): अमरावती जिल्ह्यात कोणत्याही घटकांशी भेदभाव होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. विशेषतः, एचआयव्ही (HIV) संबंधित घटकातील एचआयव्ही संक्रमित व्यक्ती, तृतीयपंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, स्थलांतरित कामगार, ट्रक ड्रायव्हर तसेच त्यांच्यासोबत असलेले सहकारी यांच्या संदर्भात ओळखपत्र आणि सामाजिक सुरक्षेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजना देताना सर्व विभागांनी सचेत असावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

तृतीयपंथीयांच्या दत्तक बाळाला लिंग प्रमाणपत्र सुपूर्द: एक महत्त्वपूर्ण निर्णय!

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा नुकतीच पार पडली. या सभेत एक विशेष बाब म्हणून, तृतीयपंथीयांनी दत्तक घेतलेल्या बाळाचे लिंग प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. या लिंग प्रमाणपत्राबाबत यापूर्वी अडचण निर्माण झाली होती, मात्र यात एक विशेष समिती स्थापन करून निर्णय घेण्यात आला आहे, जो सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

बैठकीतील प्रमुख उपस्थिती:

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी शैलेजा एम., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी उपस्थित होते.

यासोबतच, बैठकीला महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परिसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, शहरी क्षयरोग अधिकारी डॉ. फिरोज खान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्देशामुळे समाजातील वंचित आणि संवेदनशील घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!