news
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमध्ये ‘घरांसाठी’ रणकंदन: नखातेंचा मनपावर हल्लाबोल, ‘७ लाखांची घरे १३ लाखांना’ म्हणत कामगारांचा एल्गार!

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘घरांसाठी’ रणकंदन: नखातेंचा मनपावर हल्लाबोल, ‘७ लाखांची घरे १३ लाखांना’ म्हणत कामगारांचा एल्गार!

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी १० हजार घरांची मागणी; रावेत प्रकल्पातील लाभार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप, प्रशासन घेणार का दखल? (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपा समोर घरांसाठी जनआंदोलन: ‘७ लाखांची घरे १३ लाखांना?’ – कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा हल्लाबोल!

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि कामगारांसाठी १० हजार घरांची मागणी; ‘शुद्ध फसवणूक’ झाल्याचा आरोप, प्रशासन घेणार का दखल?

पिंपरी, दि. १७ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड शहराच्या कामगारनगरीत आता परवडणाऱ्या घरांसाठी तीव्र आंदोलन सुरू झाले आहे! पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, गरजू नागरिक आणि कामगारांसाठी १० हजार घरांची निर्मिती करावी, तसेच रावेत येथील पात्र लाभार्थ्यांना किवळे गृहप्रकल्पात निश्चित केलेल्या ६ लाख ९५ हजार रुपयांच्या मूळ किमतीतच घरे देण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाने कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात आज महापालिकेसमोर जोरदार धरणे आंदोलन केले. ‘७ लाखांची घरे १३ लाखांना’ ही ‘शुद्ध फसवणूक’ असल्याचा संतप्त आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलनातील प्रमुख मागण्या आणि ‘फसवणुकी’चा आरोप:

आंदोलकांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या:

  • १० हजार घरांची मागणी: पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी आणि कामगारनगरी असल्याने येथे घरांसाठी गरजू असणाऱ्या नागरिकांची आणि कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. महानगरपालिकेने निर्माण केलेली घरांची संख्या कमी असल्याने, किमान १० हजारांपेक्षा अधिक घरांच्या निर्मितीची गरज आहे.
  • रावेत प्रकल्पातील ‘फसवणूक’: सन ऑगस्ट २०२० मध्ये महानगरपालिकेकडून रावेत येथे गृहप्रकल्प करण्यात येणार म्हणून नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आणि ९३४ लाभार्थी निश्चित करण्यात आले. मात्र, पाच वर्षे उलटूनही हा प्रकल्प पूर्ण झाला नाही, यात मनपाला अपयश आले. त्यामुळे महानगरपालिकेने या लाभार्थ्यांची ‘शुद्ध फसवणूक’ केली असल्याचा आरोप नखाते यांनी केला.
  • दुपटीने वाढलेली किंमत: आता महानगरपालिका याच लाभार्थ्यांना याच किमतीत घरे न देता, केवळ किवळे प्रकल्पात १३ लाख रुपये किमतीमध्ये म्हणजे दुप्पट किमतीने घरे देण्याचा घाट घालत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. “महानगरपालिकेने केलेल्या चुकांचा भुर्दंड सामान्य सर्वसामान्य लाभार्थ्यांना का?” असा सवाल करत, महानगरपालिकेने ठरलेल्या दरातच घरे देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली.
  • पंतप्रधान आवास योजनेचे अनुदान: पंतप्रधान आवास योजनेस मुदतवाढ दिल्याने, या योजनेचा लाभही या रावेत येथील लाभार्थ्यांना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
  • डुडुळगाव प्रकल्पाची सोडत: डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाची सोडत त्वरित काढण्यात यावी, अशीही मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनातील सहभाग आणि घोषणाबाजी:

या आंदोलनात कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महिलाध्यक्ष वृषाली पाटणे, माधुरी जलमूलवार, मनपा सदस्य किरण साडेकर, सलीम डांगे, नरसिंग माने, माऊली भोसले, गजानन बाजड, कालिदास गायकवाड, सुनील भोसले, राजेश माने, संभाजी वाघमारे, जरीता वाठारे, तुकाराम माने, सखाराम केदार, अंबादास जावळे, अंजुबाई राठोड, जितेंद्र महाजन, संदीप कांबळे, भागवत नागपुरे, अमृत पाटील, शुभांगी चव्हाण, शमशुद्दीन शेख, युनूस बेग, मंगेश पालके, अश्विनी मालुसरे, नंदू आहेर, बरगल्ली गावडे यांच्यासह शहर व जिल्ह्यातील कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात झाली. मनपा भवनासमोर आल्यानंतर लाभार्थ्यांनी “घर कधी देता घर?”, “मनपाच्या चुकांमुळे आम्हाला भुर्दंड कशासाठी?”, “७ लाखाचे १३ लाख कसे झाले?”, “आवास योजना आहे की भास योजना?”, “५ वर्षे झाले अजून किती प्रतीक्षा करावी?” अशा प्रकारच्या मोठ्या घोषणा देत आणि मागण्यांचे फलक घेऊन आंदोलन केले.

प्रशासनासोबत चर्चा आणि पुढील दिशा:

आंदोलक शिष्टमंडळाने महानगरपालिका उपायुक्त अण्णा बोदडे आणि प्रकल्प कार्यकारी अभियंता अनघा पाठक यांचेशी चर्चा केली. या विषयावर लवकरच आयुक्तांशी चर्चा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

या आंदोलनामुळे पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित झाले असून, प्रशासनाला यावर तातडीने तोडगा काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!