पिंपरीमध्ये संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेचा एल्गार: भ्याड हल्ल्याचा निषेध, मंत्र्यांच्या बेजबाबदारपणावरही प्रहार!
प्रवीण गायकवाड आणि विजयकुमार घाडगे यांच्यावरील हल्ल्याविरोधात जोरदार आंदोलन; कृषिमंत्र्यांच्या ‘पत्त्याच्या’ खेळावरही संताप व्यक्त!
पिंपरी, दि. २२ जुलै २०२५: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज पिंपरी येथे सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हल्ल्याचा निषेध आणि कठोर कारवाईची मागणी:

संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने भाजपचा गुंड दीपक काटे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गुंड सुरज चव्हाण तसेच महायुतीच्या गुंडांचा जाहीर निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे “भाजपच्या गुंडांकडून” भ्याड हल्ला झाला, तर छावा संघटनेचे विजय भैया घाडगे पाटील यांच्यावर “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गुंड टोळीने” भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान, नेत्यांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. प्रदर्शनकर्त्यांनी “जय जिजाऊ”, “जय शिवराय”, “हल्लेखोरांना अटक करा” अशा जोरदार घोषणा दिल्या.
कृषिमंत्र्यांच्या बेजबाबदारपणावरही संताप:

या आंदोलनादरम्यान एक विशेष प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशन चालू असताना सभागृहात मोबाईलमध्ये पत्ते खेळत बसले होते, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावरच पत्त्याचा डाव मांडत माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला. “या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत, सरकार आणि मंत्र्यांच्या बेजबाबदारपणावरही आंदोलकांनी तीव्र रोष व्यक्त केला. राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत असताना, त्यांच्या प्रश्नांवर न बोलता मंत्र्यांनी असे वर्तन करणे निषेधार्ह असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
विविध संघटनांचा सहभाग आणि लढ्याचा निर्धार:

या आंदोलनाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी केले होते. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव सर, शहर उपाध्यक्ष श्री पाटील सर, सचिव दिलीप गावडे सर, मार्गदर्शक अशोकराव सातपुते सर, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्ष सुलभाताई यादव, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री धनाजी येळकर पाटील साहेब व त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या छावा संघटनेचे मनोज अण्णा मोरे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
याशिवाय, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय छावा संघटना, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, छावा मराठा सेना, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रीय छावा संघटना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट), विर भगतसिंह विद्यार्थी परिषद यांच्यासह पुरोगामी विचारांचे तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.
संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, छावाचे शहराध्यक्ष गणेशजी जाधव, संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर सचिव श्रीकांत भाऊ गोरे, सहसचिव सदाशिवराव लोभे, शहर कार्याध्यक्ष अप्पासाहेब चांदवडे, वैभवजी जाधव, नकुलजी भोईर, विवेकजी गायकवाड, परशुराम भाऊ रोडे, वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष नारायणराव बिराजदार, संतोषजी बोरुळे, ख्रिस्ती समाज बांधव यांच्या वतीने राजनजी नायर सर, शिवशाही व्यापारी संघटनेचे अध्यक्ष युवराजजी दाखले, कामगार नेते काशिनाथजी नखाते इत्यादी मान्यवरांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करून देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गुंडगर्दी आणि महायुती सरकारच्या कृत्याचा जाहीर निषेध करून रोष व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे त्यांचा आवाज दाबला जाणार नाही. सामाजिक न्यायासाठी आणि बहुजन हितासाठी त्यांचा लढा अधिक तीव्र होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जय जिजाऊ!
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
