साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने, शाहिरी, विचारवंतांचे परिसंवाद, गीत गायन, गझल, कवीसंमेलन तसेच सांस्कृतिक गीते तसेच इतर प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन…
पिंपरी, दि. ३१ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात होणाऱ्या या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५) सकाळी ९.३० वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
या महोत्सवाला केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय अनेक खासदार, आमदार आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
विचार प्रबोधन पर्वातील कार्यक्रमांची रेलचेल
या पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवानी शहरवासीयांना अनुभवता येणार आहे. यात शाहिरी, व्याख्याने, गझल, लोकगीते, सांस्कृतिक गीते, कवीसंमेलन, भक्तिगीते, पारंपरिक वाद्यांचे वादन, महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम, एकपात्री प्रयोग आणि ‘लोककला महाराष्ट्राची’ असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाचे काही ठळक वैशिष्ट्ये:
- शुक्रवार, १ ऑगस्ट: आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अभिवादन आणि उद्घाटन सोहळा. त्यानंतर सनई वादन, हलगी वादन, गीत गायन (स्वर चंदन), शाहिरी जलसा (बापू पवार), सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम (शेखर साळवे), ‘हसा व निरोगी रहा’ तणावमुक्ती कार्यक्रम (महाराष्ट्राचे हास्य सम्राट चॅनेल स्टार), बॅन्ड स्पर्धा, ‘डक्कलवारांचे बसव पुराण’ हा दुर्मिळ कार्यक्रम, देशभक्तीपर गीते (गायिका ममता नेणे) आणि भक्तीगीते व लोकगीतांचा कार्यक्रम.
- शनिवार, २ ऑगस्ट: प्रबोधनपर गीते, ‘गीते – अण्णा भाऊंची’, गजलांच्या माध्यमातून अण्णाभाऊंना वंदन, ‘लहूजी वस्ताद साळवे – एक थोर क्रांतीगुरू’ या विषयावर व्याख्यान (विशाल मराठे), ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान’ यावर परिसंवाद आणि ‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे – एक थोर साहित्यिक’ यावर सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे विशेष व्याख्यान.
- रविवार, ३ ऑगस्ट: ‘होय मी सावित्री फुले बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग, महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीते, ‘अनुसूचित जातीतील अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरणाची दिरंगाई?’ यावर परिसंवाद, तसेच ६५ कलाकारांचा भव्य दिंडी महोत्सव आणि विविध लोकगीतांचे कार्यक्रम.
- सोमवार, ४ ऑगस्ट: ‘स्वर्ण लहरी’ ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, क्रांतिकारी गीते, ‘ओल्ड इज गोल्ड’ ऑर्केस्ट्रा आणि ‘१८७१ चा गुन्हेगारी जमातीचा कायदा आणि त्यांचे झालेले मातंग समाजावरील परिणाम’ या विषयावर परिसंवाद.
- मंगळवार, ५ ऑगस्ट: प्रबोधनपर गीते, ‘वंदन साहित्यांच्या शिल्पकारांना’ हा सुपरस्टार कलाकारांचा कार्यक्रम, ‘मातंग समाजाच्या विकासाची उद्दिष्टे’ यावर परिसंवाद, अण्णांची गौरव गाथा आणि भव्य समारोप कार्यक्रम.
- बुधवार, ६ ऑगस्ट: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी येथे निमंत्रित कवींचे विशेष कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आवाहन
या पाच दिवसीय विचार प्रबोधन कार्यक्रमास शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
