पिंपरीच्या ‘गोमाते’ला न्याय कधी? महावितरण दोषी, पण ‘गोहत्या’ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
पिंपरी गावातील एका गायीच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी महावितरण कंपनीला अखेर दोषी ठरवण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या अथक पाठपुराव्यानंतर विद्युत निरीक्षक कार्यालयाने अहवाल सादर केला आहे. यात महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाल्याचे सिद्ध झाले असून, कंपनीला नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कुदळे यांनी हा लढा येथेच थांबवलेला नाही. त्यांची मागणी आहे, की केवळ नुकसान भरपाई देऊन भागणार नाही, तर या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ‘गोहत्या’ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
महावितरणच्या हलगर्जीपणाचा पर्दाफाश
पुणे येथील विद्युत निरीक्षक कार्यालयाने केलेल्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. १२ मे २०२५ रोजी पिंपरीच्या वैभव नगर फेज-१ मध्ये महावितरणचा एक लघुदाब फिडर पिलर होता. त्याजवळची एक वीजवाहिनी (केबल) जमिनीवर उघडी होती आणि कचरा जाळल्याने तिचे इन्सुलेशन जळाले होते. त्यामुळे त्यातून वीजप्रवाह बाहेर येत होता. या वीजप्रवाहामुळे फिडर पिलरमध्येही करंट उतरला होता. विशेष म्हणजे, अशावेळी वीजपुरवठा खंडित करणारी सुरक्षा साधनेही योग्य प्रकारे काम करत नव्हती. याच विद्युतभारीत पिलरच्या संपर्कात आल्याने त्या दुर्दैवी गायीचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताला पूर्णपणे महावितरण कंपनीच जबाबदार असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, दोषींवर कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणात महावितरणने केलेल्या चुकीवर बोट ठेवण्यापलीकडेही काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. मृत गाईची विल्हेवाट लावताना पोलिसांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. सहाय्यक अभियंता श्री. वैभव देशमुख आणि वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. दीपक ठाकूर यांनी पोलिसांना कल्पना न देताच गाईची विल्हेवाट लावली. सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांच्या मते, हे एकप्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आले, याचीही चौकशी व्हायला हवी.
सुहास कुदळे यांनी नुकसान भरपाई स्वीकारून हा लढा संपवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जोपर्यंत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गोहत्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते मागे हटणार नाहीत. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली असून, लवकरच या दोषींवर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या मते, खऱ्या अर्थाने या ‘गोमाते’ला तेव्हाच श्रद्धांजली मिळेल, जेव्हा दोषींवर कठोर कारवाई होईल.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
