पिंपरी-चिंचवड: अग्निसुरक्षेचे कवच अधिक मजबूत!
शहराच्या झपाट्याने वाढत्या गरजांसाठी नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणी वेगात
पिंपरी, दि. ५ ऑगस्ट २०२५: पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा झपाट्याने होणारा विकास पाहता, आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज बनली आहे. याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, यामुळे भविष्यातील कोणत्याही संकटाचा सामना करणे अधिक सोपे होणार आहे.
सध्या शहरात पिंपरी येथील मुख्य केंद्रासह एकूण १० अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे औद्योगिक व निवासी भागांना २४x७ सेवा पुरवतात. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे मदतीचा प्रतिसाद वेळ (Response Time) कमी करणे, प्रत्येक भागापर्यंत सेवा पोहोचवणे आणि मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी विशेष सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. याच गरजेतून महापालिकेने आणखी नवीन केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या केंद्रांची उभारणी: प्रगतीपथावर
महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम सध्या जोमाने सुरू आहे. काही ठिकाणी बांधकामाला सुरुवात झाली आहे, तर काही ठिकाणी नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
- बांधकाम सुरू असलेली केंद्रे: पुनावळे, दिघी, निगडी प्राधिकरण येथील हेडगेवार भवन आणि पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालय येथे सध्या केंद्रांचे बांधकाम सुरू आहे.

- प्रस्तावित केंद्रे: भोसरी एमआयडीसी (F-2 ब्लॉक) येथे निविदा प्रक्रिया (Tender Process) सुरू आहे. याशिवाय, पिंपळे निलख (संरक्षण खात्याची जागा) आणि चऱ्होली (वर्ल्ड प्राईड सिटी परिसर) येथे भूसंपादन करून नवीन केंद्रे उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाचा दूरदृष्टी विचार
या प्रकल्पाबद्दल बोलताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले, “शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येक प्रभागात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. ही केंद्रे नागरिकांसाठी केवळ यंत्रणा नसून सुरक्षा कवच ठरणार आहेत.”

याचसोबत, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले की, “शहराच्या गरजेनुसार जागा निश्चिती, आराखडा मंजुरी आणि निधी वितरण प्रक्रिया सुरू आहे. अग्निशमन केंद्रे केवळ भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर धोरणात्मकदृष्ट्याही संतुलित असावीत, यावर आमचा भर आहे.”
अग्निशमन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांनी नव्या केंद्रांची वैशिष्ट्ये सांगितली. “नव्या केंद्रांमध्ये आधुनिक उपकरणे, जलद प्रतिसाद देणारी वाहने आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील. औद्योगिक क्षेत्रांसाठी केमिकल फायरसाठी विशेष उपाययोजना आणि रहिवासी भागात धुरामुळे होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे आम्ही केवळ आग विझवण्यावर नव्हे, तर सुरक्षेवरही भर देणार आहोत,” असे ते म्हणाले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
