news
Home मुख्यपृष्ठ ‘सुरक्षिततेच्या अभावामुळे ३ कामगारांचा बळी’; चिंचवडमध्ये बीएसएनएलवर निष्काळजीपणाचा आरोप

‘सुरक्षिततेच्या अभावामुळे ३ कामगारांचा बळी’; चिंचवडमध्ये बीएसएनएलवर निष्काळजीपणाचा आरोप

बीएसएनएलच्या निष्काळजीपणामुळे जीव गमावलेल्या कामगारांना न्याय मिळावा; कुटुंबियांना १० लाखांच्या मदतीची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण? चिंचवडमध्ये बीएसएनएलविरोधात ‘आक्रोश’ आंदोलन

 

 

निष्काळजीपणामुळे ३ कामगारांचा बळी, दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे :- २० ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

निगडी प्राधिकरण येथे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ऑप्टिकल फायबरचे काम करताना निष्पाप तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेला सहा दिवस उलटले तरी दोषींवर कारवाई न झाल्याने, आज कष्टकरी संघर्ष महासंघाने चिंचवड येथील बीएसएनएल कार्यालयाबाहेर जोरदार ‘कामगार आक्रोश आंदोलन’ केले. कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, मृत कामगारांच्या कुटुंबियांना तातडीने न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनात बोलताना नखाते यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असतानाही कामगारांना धोकादायक ठिकाणी कामाला लावले गेले. सुरक्षिततेची साधने दिली नाहीत आणि आपत्कालीन व्यवस्थाही नव्हती. ‘एक कामगार अस्वस्थ झाल्यावर मदत मागण्यासाठी दुसरा, आणि नंतर तिसरा असे एक-एक करून तिघांचा जीव गेला,’ असे सांगत नखाते यांनी प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड केला. या दुर्दैवी घटनेत लखन धावारे, दत्ता होनाळे, आणि साहेबराव गिरशेटे यांचा मृत्यू झाला आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघाने याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि बीएसएनएलच्या दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या आंदोलनात अनिल बारवकर, राजू बिराजदार, राजेश माने यांच्यासह शहरातील विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर बीएसएनएलचे अधिकारी डी.पी. शिंदे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले आणि यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!