news
Home पिंपरी चिंचवड टाकाऊतून ‘अभिमान’ निर्माण: पिंपरी-चिंचवडला लवकरच मिळणार ‘वेस्ट टू वंडर’ थीम पार्क!

टाकाऊतून ‘अभिमान’ निर्माण: पिंपरी-चिंचवडला लवकरच मिळणार ‘वेस्ट टू वंडर’ थीम पार्क!

जगभरातील १७ ऐतिहासिक कलाकृती साकारल्या जाणार; अतिरिक्त आयुक्तांनी दिला दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा आदेश. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘वेस्ट टू वंडर’ थीम पार्कचे काम दोन महिन्यांत पूर्ण करा: अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांचे निर्देश

 

 

पिंपळे सौदागर येथील उद्यानाला भेट देत घेतला कामाचा सविस्तर आढावा; टाकाऊ वस्तूंमधून साकारणार जागतिक ऐतिहासिक कलाकृती

 

२२ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महत्त्वाकांक्षी ‘वेस्ट टू वंडर थीम पार्क’ पुढील दोन महिन्यांत वेळेत आणि काटेकोर नियोजनासह पूर्ण करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिले आहेत. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील या प्रकल्पाच्या कामाची त्यांनी नुकतीच पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी उद्यानात उभारण्यात येत असलेल्या प्रत्येक ऐतिहासिक प्रतिकृतीच्या कामाची गुणवत्ता उच्च दर्जाची असावी, यावर विशेष भर दिला. त्यांनी फूड स्टॉल, पार्किंग सुविधा, तिकीट काउंटर, वृक्षारोपण, सुरक्षा व्यवस्था, कंपाऊंड भिंत, पिण्याच्या पाण्याची सोय आणि विद्युत रोषणाई यासह विविध कामांचा आढावा घेतला. महावितरण विभागाशी समन्वय साधून विद्युत विषयक कामे तसेच स्थापत्य विभागाची सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


 

टाकाऊ साहित्यापासून जागतिक वारसा

 

या थीम पार्कमध्ये जगभरातील १७ जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती टाकाऊ साहित्यापासून उभारण्यात येत आहेत. यामध्ये ताजमहल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिफा, लीनिंग टॉवर ऑफ पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजंठा लेणी, ला सागराडा फॅमिलीया, पिरॅमिड ऑफ गिझा, कोलोसियम ऑफ रोम, बिग बेन ऑफ लंडन, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि हंपी चारियट यांसारख्या प्रसिद्ध कलाकृतींचा समावेश आहे. या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे उद्यानाला एक आगळीवेगळी ओळख मिळणार आहे.

 


साधु वासवानी उद्यानाचीही पाहणी

 

याच दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी महापालिकेच्या ‘ग’ प्रभागातील साधु वासवानी उद्यानालाही भेट दिली. उद्यानाचे सुशोभीकरण करण्यावर त्यांनी भर देण्यास सांगितले. तसेच, उद्यानात ठिकठिकाणी सूचना फलक लावणे, दिव्यांगांसाठी प्रवेश अधिक सोयीचा करणे आणि पावसाचे पाणी योग्य प्रकारे बाहेर काढण्याची व्यवस्था करणे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!