‘महाराष्ट्र धर्म म्हणजे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांची न्यायिक सत्ता’ – प्रवीण गायकवाड
चिंचवड येथे ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ कार्यक्रमात ‘संभाजी ब्रिगेड’चे मार्गदर्शन; सिने अभिनेते किरण माने यांचीही उपस्थिती
२२ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे – ‘माझ्यावर झालेला वैयक्तिक हल्ला हा शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवरचा हल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह फुले, शाहू आणि आंबेडकर यांची न्याय सत्ता होती. ही सत्ता आणि मानवता, परिवर्तन, बुद्धाकडे जाईल असा निर्धार केला पाहिजे,’ असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी चिंचवड येथे केले.
‘संभाजी ब्रिगेड’च्या पुढाकाराने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘महाराष्ट्र धर्मासाठी’ या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी सिने अभिनेते किरण माने, समाज प्रबोधनकार गणेश महाराज फरताळे, मानव कांबळे, माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आबासाहेब ढवळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘घटना बदलण्याचे षडयंत्र सुरू’
आपल्या भाषणात प्रवीण गायकवाड यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ‘संभाजी ब्रिगेडने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणला,’ असे ते म्हणाले. ‘बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी राज्यघटना दिली. याच घटनेत छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्य संकल्पना, शाहू महाराजांची बंधुता आणि बाबासाहेबांची न्याय ही भूमिका उमटली आहे. त्यामुळेच ही घटना बदलण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा’ आरोप त्यांनी केला. शिरस्थ नेतृत्वावर हल्ला केल्यास सर्व घाबरतात, याच उद्देशाने माझ्यावर हल्ला करण्यात आला असेही ते म्हणाले. ‘भीमशक्ती आणि शिवशक्ती ही कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे,’ असे सांगत त्यांनी जनतेने महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी पुढाकार – किरण माने
यावेळी बोलताना अभिनेते किरण माने म्हणाले, ‘महाराष्ट्राची सध्याची अवस्था पाहता, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.’ ते म्हणाले की, राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी महाराष्ट्र धर्म रुजविला, संभाजी महाराजांनी तो अधिक भक्कम केला, तर फुले, शाहू, आंबेडकरांनी तो वाढवला. साताऱ्यात शिवविचारांचा प्रचार करणाऱ्या एका महिलेवर हल्ला होणे दुर्दैवी असून, राज्यात शिवरायांवर बेगडी प्रेम दाखवणारे वाढले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ‘जनसुरक्षा कायदा’ हे सत्ताधाऱ्यांनी वापरलेले ‘क्षेपणास्त्र’ असून, जनतेच्या विरोधाला रोखण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि ‘जिजाऊ वंदना’ घेऊन करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या नागरिकांचा सन्मानही करण्यात आला.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
