बस कंडक्टर ते ‘थलैवा’… सुपरस्टार रजनीकांत यांचा अर्धशतकी प्रवास
करिश्मा, साधेपणा आणि प्रेरणेची अद्वितीय कहाणी
ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब जवळकर यांच्या लेखणीतून…..
२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी – चिंचवड : भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असा कलाकार, ज्याच्या नावावरच चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडतो. सिगारेट पेटवण्याची खास शैली असो, की गॉगल लावण्याची विशिष्ट अदा, पडद्यावरची त्याची प्रत्येक हालचाल प्रेक्षकांना वेड लावते. हा करिश्माई अभिनेता म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, थलैवा… म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत! एका सामान्य बस कंडक्टरपासून ते जागतिक सुपरस्टारपर्यंतचा त्यांचा ५० वर्षांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.
‘मुन्ना, झुंड मे तो सुअर आते है, शेर अकेला ही आता है’ यांसारखे त्यांचे संवाद आणि ते सादर करण्याची खास शैली यामुळे रजनीकांत हे केवळ एक नाव नसून, प्रेक्षकांसाठी उत्साहाचे प्रतीक बनले आहेत.
शिवाजीराव गायकवाड ते ‘थलैवा’
१२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे जन्मलेल्या रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे. त्यांचे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मावडी कडेपठार गावाशी जोडलेले आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी अनेक लहान-मोठी कामे केली. अखेरीस, पोटापाण्यासाठी त्यांनी बस कंडक्टरची नोकरी स्वीकारली. मात्र, याच काळात त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
१९७५ मध्ये दिग्दर्शक के. बालचंदर यांनी त्यांना ‘अपूर्व रागंगळ’ या तमिळ चित्रपटात पहिली संधी दिली. ‘अंधारात उजळणारा प्रकाश’ असा अर्थ असलेले ‘रजनीकांत’ हे नावही त्यांनीच दिले. प्रेक्षकांना सहज लक्षात राहील, असे हे नाव नंतर एका सुपरस्टारची ओळख बनले. ‘थलैवा’ या तमिळ शब्दाचा अर्थ ‘नेता’ किंवा ‘बॉस’ असा असून, रजनीकांत यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे आणि त्यांच्या खास शैलीमुळे त्यांना ही उपाधी मिळाली.
यशोशिखरावर आणि अमिताभ बच्चन यांचा प्रभाव
रजनीकांत यांच्या यशामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचाही मोठा वाटा मानला जातो. गेल्या ४० वर्षांपासून त्यांची मैत्री आहे. रजनीकांत यांनी अनेकदा अमिताभ यांना आपले प्रेरणास्थान आणि गुरू मानले आहे. ‘डॉन’ या हिंदी चित्रपटाच्या रिमेक असलेल्या ‘बिल्ला’ (१९८०) या सिनेमाने रजनीकांतला सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला. यानंतर, ‘दीवार’, ‘त्रिशूल’, ‘मर्द’ यांसारख्या अमिताभच्या गाजलेल्या अनेक हिंदी चित्रपटांचे रिमेक त्यांनी दाक्षिणात्य भाषांमध्ये केले आणि ते प्रचंड यशस्वी ठरले. तसेच, ‘अंधा कानून’, ‘गिरफ्तार’ आणि ‘हम’ या तीन हिंदी चित्रपटांमध्येही या दोघांनी एकत्र काम केले.
रजनीकांत यांनी आतापर्यंत १७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यात सर्वाधिक तमिळ चित्रपट आहेत. हिंदी, तेलुगू, मल्याळी, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली, मात्र मराठी कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी एकाही मराठी चित्रपटात काम केलेले नाही.
राजकारण, अध्यात्म आणि साधेपणा
२०१७ मध्ये राजकारणात येण्याची घोषणा करून रजनीकांत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. मात्र, २०२० मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घेतला. “निवडणुकीत सहभागी होणे हे माझ्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे आणि माझ्या जनतेची दिशाभूल करणे होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणातून दूर असले तरी, रजनीकांत यांचा प्रभाव आजही कायम आहे. वैयक्तिक आयुष्यात ते अत्यंत साधेपणाने वावरतात. मेकअप किंवा भडक पेहराव टाळून ते अध्यात्म आणि मानवी मूल्यांना विशेष महत्त्व देतात. ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांचे हे यश आणि आजही कायम असलेली लोकप्रियता हेच सिद्ध करते की, रजनीकांत हे केवळ अभिनेते नसून एक सांस्कृतिक चळवळ आहेत.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
