सांस्कृतिक कार्यक्रमांतून संस्कृती जतन करणे शक्य: आमदार उमा खापरे
चिंचवड प्राधिकरण भाजप मंडलाच्या श्रावण महोत्सवाला उदंड प्रतिसाद; भजन व मंगळागौर स्पर्धांचे आयोजन
२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी – हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणात विविध धार्मिक व्रत-वैकल्ये केली जातात, आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमांतून पुढच्या पिढीसाठी संस्कृती जपण्याचे मार्गदर्शन मिळते, असे मत आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष चिंचवड प्राधिकरण मंडलाच्या वतीने सावरकर भवन येथे आयोजित केलेल्या ‘श्रावण महोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या महोत्सवात भजन स्पर्धा, मंगळागौर खेळ, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
विजेत्यांचा गौरव
या महोत्सवात आयोजित केलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
भजन स्पर्धेत गजानन भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला, तर सुखदा भजनी मंडळाने द्वितीय आणि गुरूदत्त भजनी मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. मंगळागौर खेळात शालिनी ग्रुपने प्रथम, संस्कृती ग्रुपने द्वितीय आणि सिद्धलक्ष्मी ग्रुपने तृतीय क्रमांक पटकावून सर्वांचे लक्ष वेधले.
या सांस्कृतिक कार्यक्रमांचे संयोजन जयदीप खापरे, अनुप मोरे आणि ज्योती कानिटकर यांनी केले होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
