स्मार्ट सिटीमध्ये परंपरेचा जागर: महिलांनी पारंपरिक खेळांतून मंगळागौर उत्साहात साजरी
नवी सांगवी येथे विविध वयोगटातील महिलांचा सहभाग; ‘स्त्री ही लक्ष्मीसोबत दुर्गाही होऊ शकते’: प्रीती मराठे
२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
नवी सांगवी – आजच्या स्मार्ट सिटीच्या जगातही आपली समृद्ध संस्कृती जपण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, हे सुयोग कॉलनी महिला मंडळ आणि ओम साई फाउंडेशनने मंगळागौरी उत्सवाद्वारे दाखवून दिले. महिलांनी या कार्यक्रमात पारंपरिक खेळ आणि गाण्यांतून आपली संस्कृती पुढच्या पिढीला शिकवण्याचा अनोखा प्रयत्न केला.
या कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौरी पूजन आणि अन्नपूर्णा देवीच्या प्रतिमेची स्थापना करून झाली. त्यानंतर महिलांनी पारंपरिक खेळांना सुरुवात केली. साधी फुगडी, चौफला फुगडी, जाते फुगडी, सूपली फुगडी यांसारख्या अनेक मजेदार प्रकारांत खेळ रंगला. तसेच, पारंपरिक गाण्यांवर नृत्य करून महिलांनी महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जपली. त्यांच्या या प्रयत्नांना इतर महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘स्त्री ही लक्ष्मीसोबत दुर्गाही होऊ शकते’
यावेळी बोलताना सुयोग कॉलनी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रीती मराठे म्हणाल्या की, “एक स्त्री लक्ष्मी असते, पण त्या लक्ष्मीला जर कोणी त्रास दिला, तर ती दुर्गासुद्धा होऊ शकते. आजच्या काळात लक्ष्मीसोबत दुर्गाही होण्याची काळाची गरज आहे.”
या कार्यक्रमात ४ वर्षांच्या लहान मुलींपासून ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्व वयोगटातील महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. यातून ही संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे संक्रमित होत असल्याचे दिसून आले.
ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. त्यांच्याकडून दरवर्षी अशा पारंपारिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे सांगत शालिनी यादव यांनी त्यांचे आभार मानले.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
