पावसाळ्यामुळे वडमुखवाडी येथील संतभेटीच्या स्थळावरील ध्वजपताका तात्पुरती उतरविण्याचा महापालिकेचा निर्णय
सुरक्षेच्या दृष्टीने १५ ऑक्टोबरपर्यंत ध्वजस्तंभ रिकामा राहणार; पाऊस थांबल्यावर पुन्हा फडकविण्याची घोषणा
२५ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे – पिंपरी-चिंचवड शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेला चऱ्होली, वडमुखवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेट स्थळावरील भव्य ध्वजस्तंभावरील ध्वजपताका तात्पुरती उतरविण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यांमुळे ध्वजपताकेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
२०० फुटी ध्वजस्तंभ शहराची ओळख
वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेला हा ध्वजस्तंभ तब्बल ६० मीटर (२०० फूट) उंच आहे. येथील ध्वजपताकेचे माप १८.३ मीटर x १२.२ मीटर (४२ फूट x ३४ फूट) असून, हा ध्वज परिसरातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे (Wind Load) ध्वज फाटण्याची किंवा तिरप्या झोतामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे, अशी माहिती सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी दिली आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत ध्वज उतरविणार
या निर्णयानुसार, दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत ही ध्वजपताका उतरविली जाईल. या कालावधीत ध्वजस्तंभावर ध्वज नसला तरी, हा स्तंभ यथास्थित राहणार आहे. पावसाळा संपल्यानंतर, पुन्हा एकदा पारंपरिक आणि औपचारिक पद्धतीने ध्वजपताका फडकविण्यात येईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ध्वजपताकेची सुरक्षितता सुनिश्चित होणार आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
