रहाटणीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कृत्रिम हौद
माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकाराने मूर्ती संकलन केंद्राची सोय
३१ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे – गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणाची काळजी घेणे आवश्यक आहे, याच विचारातून माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी रहाटणी येथे कृत्रिम हौद आणि गणेश मूर्ती संकलन केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.
पर्यावरण संवर्धन आणि उत्सवाचा समतोल
रहाटणी लिंक रोडवरील छत्रपती चौकात उभारलेल्या या केंद्राचा उद्देश गणेश भक्तांना पर्यावरणपूरक विसर्जनाचा सोपा पर्याय उपलब्ध करून देणे आहे. पीओपी मूर्ती आणि प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बाबासाहेब त्रिभुवन यांनी केले आहे. “गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धन आणि गणेश भक्तांचा उत्साह यांचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम आहे,” असे ते म्हणाले.
या उपक्रमाला प्रतिसाद देत, अनेक नागरिकांनी त्यांच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन या केंद्रात केले आहे. येत्या पाचव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशी होणाऱ्या विसर्जनासाठीही नागरिकांनी या केंद्राचा लाभ घेऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्रिभुवन यांनी केले आहे.
हा उपक्रम गणेशोत्सवाची पवित्र परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा ठरला असून, नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
