news
Home पिंपरी चिंचवड महिलांच्या सक्षमीकरणाचे नवे पर्व: ‘सक्षमा’ प्रकल्प घडवतोय उद्याचे नेतृत्व

महिलांच्या सक्षमीकरणाचे नवे पर्व: ‘सक्षमा’ प्रकल्प घडवतोय उद्याचे नेतृत्व

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; पिंपरी-चिंचवडच्या फेडरेशन लीडर्ससाठी क्षमता बांधणी कार्यशाळा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

महिलांना नेतृत्व विकासासाठी ‘सक्षमा’ प्रकल्प; प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

 


 

पिंपरी चिंचवड महापालिका आणि टाटा स्ट्राइव्हच्या संयुक्त विद्यमाने ‘फेडरेशन लीडर्स’साठी क्षमता बांधणी कार्यशाळा

 

पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे, ०९ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्या ‘सक्षमा’ प्रकल्पांतर्गत आयोजित फेडरेशन लीडर्स प्रशिक्षण कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मोरवाडी येथील नाना-नानी पार्क येथे आयोजित या क्षमता बांधणी प्रशिक्षणामुळे महिलांना नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी समाजसेवक विशाल शेडगे, सक्षमा प्रकल्प संचालक सचिन उपाध्ये यांच्यासह ‘उडान’, ‘आरंभ’ आणि ‘झेप’ या तीन फेडरेशनमधील एकूण २६ महिला लीडर्स सहभागी झाल्या होत्या. तसेच, झोनल सोशल वर्कर्स आणि फील्ड कोऑर्डिनेटर्सदेखील उपस्थित होते.


अंतर्गत नेतृत्वावर भर

 

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात गणपती नांगरे (क्षमता बांधणी प्रमुख) यांनी प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. यात ‘अंतरंगातून नेतृत्व करणे’ या विषयावर विशेष भर देण्यात आला. यामध्ये स्वतःचे नेतृत्वगुण ओळखणे, अंतर्मनाचा आवाज ऐकणे, इतरांचे नेतृत्व करणे, भविष्य घडवणे, तसेच लैंगिक समतोल अर्थसंकल्प आणि लैंगिक समानता यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. हे सत्र परस्परसंवादी आणि कृतीआधारित पद्धतीने घेण्यात आले, ज्यात सर्व महिला लीडर्सनी उत्साहाने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन उपाध्ये यांनी, तर सूत्रसंचालन निशा निमसे यांनी केले.


महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश

 

यावेळी बोलताना उपायुक्त ममता शिंदे यांनी, “महिलांनी शिक्षण सुरू ठेवावे, आपले नेतृत्वगुण विकसित करावेत, वैयक्तिक आणि सामाजिक विकासाकडे लक्ष द्यावे,” यावर जोर दिला. अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे महिलांना स्वतःमधील गुणांची वृद्धी करण्यास मदत होते, असेही त्या म्हणाल्या.

हा प्रकल्प महिलांना आत्मनिर्भर बनवून त्यांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात सक्रियपणे सहभागी करून घेण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!