‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख – उपमुख्यमंत्री अजित पवार
‘रंगानुभूति’ महोत्सवाचे उद्घाटन; सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांचा गौरव
पिंपरी, प्रतिनिधी शाम सोनवणे २१ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहराची ओळख केवळ ‘औद्योगिक नगरी’ म्हणून नाही, तर ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून निर्माण होत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. पिंपरी-चिंचवड महापालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंगानुभूति : पूर्वरंग ते उत्तररंग’ प्रयोगकला महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
सांस्कृतिक प्रगतीसाठी महापालिकेचे योगदान
निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, अशा महोत्सवांच्या माध्यमातून महापालिका शहराच्या सांस्कृतिक प्रगतीसाठी उल्लेखनीय काम करत आहे. या महोत्सवात महाराष्ट्रासह राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील कलाकार सहभागी झाले आहेत.
यावेळी, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील सांस्कृतिक चळवळीत योगदान देणाऱ्या टेल्को कलासागर – टाटा मोटर्स पुणे, कलापिनी तळेगाव दाभाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड, नादब्रह्म संस्था, अथर्व थिएटर्स, दिशा फाउंडेशन, संस्कार भारती, नाटक घर, द बॉक्स, नाटक कंपनी आसक्त पुणे, महाराष्ट्र कल्चर सेंटर (एमसीसी) यांसारख्या अनेक संस्थांचा ‘प्रयोगकला सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.
ग.दि. माडगूळकरांच्या नावाने महोत्सवाचे महत्त्व
पवार यांनी सांगितले की, हा महोत्सव ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने उभारलेल्या नाट्यगृहात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. ‘गदिमा’ हे महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचे तेजस्वी प्रतिनिधी होते, त्यामुळे या महोत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी नाटक आणि भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना, त्यांनी सांगितले की मराठी माणसाचे पहिले प्रेम नाटक असून, त्यानेच नाट्यचळवळ जिवंत ठेवली आहे. शासनाचे सांस्कृतिक क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला आमदार अण्णा बनसोडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, हरिभाऊ तिकोने, फजल शेख, सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता बापू गायकवाड, उपायुक्त पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह प्रवीण भोळे, पैस कल्चरल फाउंडेशनचे संस्थापक प्रभाकर पवार, अमृता मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


