news
Home पिंपरी चिंचवड महाराष्ट्राच्या राजकारणातली ‘पातळी’ घसरली

महाराष्ट्राच्या राजकारणातली ‘पातळी’ घसरली

जयंत पाटलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये पडळकर अडचणीत. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

“पडळकरांच्या तोंडाला काळे फासू”: राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) इशारा

 

 

जयंत पाटलांबद्दलच्या वक्तव्यावरून पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार निषेध आंदोलन

 

पिंपरी,  प्रतिनिधी बालाजी नवले  २१ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी इशारा दिला आहे की, जर पडळकरांनी जयंत पाटील यांची तात्काळ माफी मागितली नाही, तर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल.


काय आहे नेमके प्रकरण?

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासणाऱ्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

तुषार कामठे म्हणाले की, माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी देणारे जयंत पाटील हे स्वच्छ प्रतिमेचे, अभ्यासू आणि तळमळीने जनतेचे प्रश्न मांडणारे नेते आहेत. त्यांच्याबद्दल अशी खालच्या पातळीची भाषा वापरणे हा संपूर्ण समाजाचा आणि जनतेचा अपमान आहे. अशा वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.


कायदेशीर कारवाईचा इशारा

यावेळी आंदोलकांनी सांगितले की, पडळकरांचे वक्तव्य भारतीय संविधानाच्या कलम १९(२) नुसार सार्वजनिक शिस्त आणि नैतिकतेला धक्का देणारे आहे. तसेच, भारतीय न्याय संहिता कलम ३५६  नुसार मानहानीकारक असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. धम्मराज साळवे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष राहुल आहेर सचिव योगेश सोनवणे, सचिव परमेश्वर गायकवाड, संदेश जगताप यांनी निषेध भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक गणेश भोंडवे, के के कांबळे, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष सोनल पासलकर, नागेश सदावर्ते, बबलू चंदने, ॲड.विजय बाबर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने पडळकर यांचा निषेध नोंदवत महाराष्ट्राच्या राजकारणात आदरयुक्त परंपरा जपण्याचे आवाहन केले.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडल्यास राज्यभरात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!