पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा’ मोहिमेचा धडाका; विविध भागांतून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, ६ मे २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे शहरात १ मे ते १५ मे दरम्यान ‘अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा’ मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्ते आणि पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्यासाठी ही धडक कारवाई सुरू आहे.
-
‘फ’ प्रभाग: २ व ३ मे रोजी आरटीओ रोड, त्रिवेणी नगर चौक, तळवडे चौक आणि देहू-आळंदी रोड परिसरात कारवाई करण्यात आली. येथे टपऱ्या, हातगाड्या आणि लोखंडी रॅकसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
-
‘प्रभाग क्र. १’ (चिखली): सत्संग रोड ते पिंगळे चौकपर्यंतचा संपूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला.
-
‘इ’ क्षेत्रीय कार्यालय (भोसरी): ३ व ४ मे रोजी आळंदी रोड आणि भोसरी नाट्यगृह परिसरात हातगाड्या, इलेक्ट्रिक काटे आणि कपड्यांचे गाठोडे जप्त करण्यात आले.
-
‘ड’ प्रभाग (रहाटणी): ४ मे रोजी जगताप डेअरी ते पिके चौक, कुणाल आयकॉन रोड आणि गोविंद गार्डन परिसरात मोहिमेअंतर्गत कूलर, पाणीपुरी ठेले आणि प्लास्टिक कॅरेट जप्त करण्यात आले.
-
इतर भाग: पिंपळे सौदागर आणि ‘H’ झोनमध्येही पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
या मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेला शेकडो किलो भाजीपाला आणि फळे इस्कॉन अन्नामृत अन्नछत्र येथे जमा करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने १३ कॅरेट आंबे, १२ कॅरेट नारळ, १०० किलो बटाटा, ८० किलो टमाटर, ७० किलो भेंडी आणि इतर विविध फळभाज्यांचा समावेश आहे.
अतिक्रमण विभागाने आतापर्यंत ४ टपऱ्या, १५ हातगाड्या, २५ कूलर, १०२ प्लास्टिक कॅरेट, १३ स्टँडी बोर्ड आणि २४ दुधाचे कॅरेट यांसह अनेक वस्तू जप्त करून महापालिकेच्या गोडाऊनमध्ये जमा केल्या आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सार्वजनिक रस्ते व फूटपाथवर अतिक्रमण करू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. या मोहिमेत अतिक्रमण निरीक्षक, पोलीस कर्मचारी आणि एमएसएफ जवानांनी समन्वय साधून प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


