‘स्मार्ट’ पिंपळे सौदागरमध्ये आजही शेतीची नाळ कायम!
नागरीकरणाच्या रेट्यात ‘बैलपोळा’चा पारंपरिक उत्साह कायम; बैलांची वाजत गाजत मिरवणूक आणि पुरणपोळीचा नैवेद्य
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २२ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड शहराचा एक भाग बनलेल्या ‘स्मार्ट सिटी’ पिंपळे सौदागरमध्ये आजही शेतकऱ्यांची नाळ गावाच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे. कधीकाळी शेती आणि दुग्धव्यवसायासाठी ओळखले जाणारे हे गाव, आज उंचच उंच टॉवर्ससाठी ओळखले जाते. तरीही, श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या बैलपोळा या पारंपरिक सणाचा उत्साह येथे जराही कमी झालेला नाही. येथील शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

परंपरा आणि आधुनिकतेचा संगम
गेल्या दोन दशकांमध्ये पिंपळे सौदागरमध्ये मोठे नागरीकरण झाले. शेतीची जागा मोठमोठ्या इमारतींनी घेतली, पण येथील शेतकऱ्यांनी शेती सोडली नाही. गावातील जमिनी विकून मिळालेल्या पैशांतून त्यांनी आजूबाजूच्या गावांमध्ये शेती विकत घेतली आणि आपला प्रमुख व्यवसाय आजही कायम ठेवला. यामुळेच, शहरी भागातील असूनही या गावात बैलपोळा सणाची भव्य परंपरा टिकून आहे.

वाजत गाजत मिरवणूक आणि खास जेवण
पोळा सणाच्या दिवशी बैलांना सजवले जाते. पिंपळे सौदागर गावातील माजी पोलीस पाटील यांच्या बैलाची सर्वात आधी पूजा केली जाते. त्यानंतर, गावातून वाजत गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. हे बैल गावातील ग्रामदैवत मुंजोबा मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर आणि गुरुदत्त मंदिर, मरीआई माता मंदिर येथे दर्शनासाठी नेले जातात. त्यानंतर, शेतकरी आपल्या लाडक्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवतात, जो त्यांच्यावरच्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा प्रतीक आहे.
गावातील काटे, कुंजीर, भिसे, कुटे, झिंजुर्डे, मुरकुटे, जाचक, जगताप, लोंढे, धनवटे यांच्यासह अनेक कुटुंबांच्या बैलगाड्या शर्यतींमध्ये उत्साहाने भाग घेतात आणि पारितोषिकेही जिंकतात. शेतकऱ्यांसाठी बैल हा केवळ एक प्राणी नसून, तो त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य सदस्य आहे. बैलपोळा हा सण त्यांच्या याच अतुट नात्याचा गौरव करतो.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
