पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छतेची धुरा महिलांच्या हाती!
४५० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग; जनजागृतीवरही भर
पिंपरी- चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, २४ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’ मध्ये देशात सातवे, तर राज्यात पहिले स्थान पटकावले आहे. या यशामागे नागरिकांच्या सहभागासोबतच स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत. विशेषतः शहराची स्वच्छतेची धुरा सांभाळणाऱ्या ४५० पेक्षा जास्त महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान यामध्ये अत्यंत मोलाचे आहे.
स्वच्छतेच्या उपक्रमांना महिला कर्मचाऱ्यांची गती
महापालिकेने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कचरा विलगीकरण, आर.आर.आर (Reduce-Reuse-Recycle) आणि शून्य कचरा प्रकल्पासारखे अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीत महिला सफाई कर्मचारी आणि आरोग्य निरीक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. या महिला कर्मचारी दररोज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कचरा संकलन, नालेसफाई, आणि परिसराची स्वच्छता सुनिश्चित करतात. त्या केवळ सफाईचे कामच करत नाहीत, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासही प्राधान्य देतात.

आठ महिला आरोग्य निरीक्षकांचे नेतृत्व
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागामध्ये संतोषी कदम, रश्मी तुंडलवार, स्नेहल सोनवणे, स्नेहल सुकटे, रुपाली साळवे, स्नेहा चांदणे, कोमल फर्डे आणि रुपाली शेटे या आठ महिला आरोग्य निरीक्षकांचे काम विशेष कौतुकास्पद आहे. या निरीक्षकांनी प्रभाग स्तरावर सातत्याने देखरेख ठेवून स्वच्छतेच्या उपक्रमांना गती दिली आहे. त्या घरोघरी जाऊन जनजागृती करतात, तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच शहर स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर ठरले आहे.
या योगदानाला सलाम करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, “शहराच्या स्वच्छतेसाठी आमच्या आरोग्य निरीक्षकांचा आणि महिला-पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा एकत्रित प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.” तर उपायुक्त सचिन पवार यांनी महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दाखवलेली निष्ठा आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले.आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे म्हणाल्या की, स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग हा आमच्यासाठी सर्वात मोठा प्रेरणास्रोत आहे, नागरिकांनी थोडी जबाबदारी घेतली, तर आपण मिळून पिंपरी चिंचवड शहर देशातील सर्वात स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर शहर बनवू शकतो, आरोग्य निरीक्षक संतोषी कदम सांगतात.
© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
