news
Home मुख्यपृष्ठ शेतकऱ्यांचा आवाज दडपला! साखर आयुक्तांना ‘जाहीर माफी मागा’ अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशारा

शेतकऱ्यांचा आवाज दडपला! साखर आयुक्तांना ‘जाहीर माफी मागा’ अन्यथा कोर्टात खेचण्याचा इशारा

महिला पदाधिकाऱ्यांचा अवमान, 'असंसदीय भाषे'मुळे दीपक तावरेंच्या तातडीने हकालपट्टीची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘मुजोर साखर आयुक्त जाहीर माफी मागा, अन्यथा उच्च न्यायालयात जाणार!’ – विठ्ठल राजे पवार यांचा थेट इशारा

 


 

साखर आयुक्त दीपक तावरे यांच्यावर ‘असंसदीय भाषे’चा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे तातडीने हकालपट्टीची मागणी.

 

 पुणे, प्रतिनिधी जयश्री डिंबाळे २७ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांनी शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाच्या महिला पदाधिकारी आणि शेतकऱ्यांशी कथितपणे असंसदीय आणि अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. या ‘मुजोर’ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागू, असा थेट इशारा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांनी दिला आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे आणि गृहमंत्री तसेच मुख्य सचिव यांच्याकडे ई-मेलद्वारे तातडीने तक्रार केली आहे.

 

नेमका काय आहे प्रकार?

 

महाराष्ट्र राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपी, रिकवरी बेस रेट आणि अंतिम बिलांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी तसेच पंढरपूर येथील एका साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात निवेदन देण्यासाठी संघटना शिष्टमंडळ साखर आयुक्त कार्यालयात उपस्थित होते.

यावेळी प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांनी डॉ. भारती चव्हाण आणि इतर शेतकऱ्यांना अपमानास्पद शब्द वापरत “तुमच्याशी बोलण्यासाठी मला वेळ नाही, ऑफिसमधून बाहेर जा” असे सांगितल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

आयुक्त तावरे यांच्या हकालपट्टीची मागणी

 

साखर आयुक्त कार्यालयात शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असताना जाब विचारल्यामुळे आयुक्तांनी महिला पदाधिकाऱ्यांवर एकेरी व असंसदीय भाषा वापरल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्राद्वारे मागणी केली आहे की,

  • आयुक्त दीपक तावरे यांनी महिला पदाधिकारी व शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी.
  • तावरे यांच्यावर दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि महिलांशी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याप्रकरणी कायदेशीर तक्रार करावी.
  • आयुक्त तावरे यांची तातडीने हकालपट्टी करावी.
  • माफी न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.

यावेळी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते.

 

सोलापूर संस्थेतील गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

 

यासोबतच, विठ्ठल राजे पवार यांनी सोलापूर, माळशिरस येथील एका संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि अनियमितता झाल्याचा आरोप करत, या संस्थेची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही शासनाकडे केली आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!