news
Home अकोला बालविवाह, बालहिंसा आणि तस्करीविरोधात अकोल्यात एल्गार! ‘ॲसेस टु जस्टीस’ प्रकल्पांतर्गत भव्य जनजागृती रॅली

बालविवाह, बालहिंसा आणि तस्करीविरोधात अकोल्यात एल्गार! ‘ॲसेस टु जस्टीस’ प्रकल्पांतर्गत भव्य जनजागृती रॅली

सावित्रीबाई कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी दिली 'बालकांचे हक्क व सुरक्षितते'वर माहिती; जिल्हा प्रकल्प समन्वयकांचे मोलाचे मार्गदर्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘बालविवाह व बालहिंसा विरोधी’ जनजागृती रॅली!

 


 

अकोल्यात ३०० हून अधिक किशोरवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग; ‘मुलगी वाचवा, देश वाचवा’चा एल्गार

 

अकोला, प्रतिनिधी : विलास सावळे, दिनांक १३/१०/२०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

‘ॲसेस टु जस्टीस’ प्रकल्पांतर्गत इंडियन सोशल वेलफेयर सोसायटी, अकोला यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण दिनानिमित्त बालविवाह, बालहिंसा आणि बालक अवैध वाहतुकीविरोधात जनजागृती करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत सावित्रीबाई कन्या शाळेतील ३०० हून अधिक किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. ही रॅली सावित्रीबाई कन्या शाळा ते अग्रसेन चौक, दीपक चौकापर्यंत काढण्यात आली. रॅलीत “बालविवाह बंद करा”, “बालहिंसा थांबवा” आणि “मुलगी वाचवा, देश वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

स्थलांतरित बालकांच्या शिक्षणावर प्रकाश

 

रॅलीनंतर जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व विशद केले. त्यांनी बालविवाह, अत्याचार, बालक अवैध वाहतूक आणि शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

वाघमारे यांनी विशेषतः अकोल्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथून कामासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील बालकांच्या शिक्षणाच्या समस्यांवर प्रकाश टाकला.

समन्वयक सपना गजभिये यांनी दिवसेंदिवस वाढत असलेले बाल अत्याचार, बाल तस्करी आणि बालकांच्या सुरक्षिततेवर सखोल मार्गदर्शन केले.

या उपक्रमातून बालिकांच्या हक्कांची जाणीव वाढण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशा कार्यक्रमांद्वारे बालविवाह व बालहिंसेला प्रतिबंधित केले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या रॅलीत सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. फारेहा सुलताना, सर्व शिक्षकवृंद, चाईल्ड लाईन सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक अशोक बेलेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, सपना गजभिये, विशाल गजभिये, कम्युनिटी सोशल वर्कर राजश्री कीर्तिवार, पूजा मनवर, पूजा पवार, स्वयंसेवक गणेश चितोळे, निखिल चितोळे यांनी परिश्रम घेतले.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!