पुणे ३००० कोटी मालमत्ता हडपण्याचा डाव? – वाचवण्यासाठी १७ ऑक्टोबरला विराट मोर्चा!
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या सहभागाचे गंभीर आरोप; धर्मादाय आयुक्तांच्या मंजुरीवर जैन समाजाचा आक्षेप
पुणे/पिंपरी, दिनांक: १५ ऑक्टोंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पुणे शहरातील मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील सकल जैन समाजाच्या मालकीची आणि सन १९५८ मध्ये स्थापन झालेली ३ एकर Public Trust ची जमीन केवळ २३० कोटी रुपयांमध्ये हडपण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत सकल जैन समाजाने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. या ३ हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या मालमत्तेला वाचवण्यासाठी शुक्रवार,१७ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना आणि सर्व सामाजिक-राजकीय संघटनांना या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
- ट्रस्टची स्थापना: सकल जैन समाजाचे हिराचंद नेमचंद दोषी () यांनी १९५८ साली ३ एकर जागेत Public Trust स्थापन करून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दिगंबर जैन बोर्डिंग आणि जैन मंदिर उभे केले होते.
- आरोप: यांच्या वारसदारांनी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील ही Public Trust ची जागा गोखले कंट्रक्शन कंपनीला र.रु. २३० कोटी रकमेत विकली आहे.
- तातडीचे व्यवहार: ३० सप्टेंबर २०२५ रोजी साठेखत झाले आणि १ ऑक्टोबर २०२५ रोजी गोखले कंट्रक्शन कंपनीने जागा मिळणार हे गृहीत धरून पतसंस्थांकडून ७० कोटींचे कर्ज मंजूर करून घेतल्याचे म्हटले आहे.
- राजकीय संबंधांचे आरोप:
- गोखले कंट्रक्शन कंपनीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे भागीदार आहेत.
- धर्मादाय आयुक्तांनी ही जागा विक्री करताना सर्व नियम धाब्यावर बसवून मंजुरी दिली, कारण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक आहेत, असा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
- ३००० कोटींची मालमत्ता: गोखले कंट्रक्शन कंपनीने पत्रकार परिषदेत या प्रकल्पातून ३००० कोटी रुपये मिळणार असल्याचे जाहीर केले होते. म्हणजेच ३००० कोटींची मालमत्ता २३० कोटींमध्ये राजआश्रयाने हडपण्याचा हा डाव असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

जैन समाजाचा भव्य मोर्चा
प.पू. जैनाचार्य श्री गुप्तीनंदाजी गुरुदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सकल जैन समाजाच्या वतीने हे विक्री व्यवहार रद्द करून Public Trust ची जागा वाचवण्यासाठी शांततेत, अहिंसक पद्धतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
- मोर्चाची तारीख व वेळ: शुक्रवार, १७ ऑक्टोंबर २०२५, सकाळी ९.०० वाजता.
- प्रारंभ स्थान: मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे.
- समाप्ती स्थान: जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
मारुती भापकर आणि विनोद डोरले यांनी पिंपरी चिंचवड शहरातील इतर सर्व समाज बांधवांना, सामाजिक संस्था-संघटना व सर्व राजकीय पक्षांना या जनहिताच्या लढ्यात सहभागी होण्याची नम्र विनंती केली आहे.
© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
