60
‘सुरक्षित दिवाळी’ मोहीम सुरू! – PCMC अग्निशमन दलाचे नागरिकांना सुरक्षितता पाळण्याचे आवाहन
आगीच्या घटना टाळण्यासाठी १० केंद्रे २४ तास सज्ज; फटाक्यांच्या स्टॉलजवळ Patrolling
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. १७ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:दिवाळीचा सण तोंडावर असताना, फटाक्यांमुळे होणाऱ्या संभाव्य आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ‘सुरक्षित दिवाळी’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत विशेष जनजागृती आणि आपत्कालीन तयारी पूर्ण करण्यात आली असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोर पालन करून आनंददायी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
अग्निशमन दल २४ तास सज्ज- दिवाळी काळात शहरात आगीच्या घटनांची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन विभाग अत्यंत सतर्क झाला आहे:
-
कर्मचारी २४ तास कार्यरत: महापालिकेच्या सर्व १० अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या रजा रद्द करून ते २४ तास कार्यरत राहतील.
-
नियंत्रण कक्ष: मुख्य नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, आग लागल्यास १०१ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
गस्त: फटाक्यांच्या स्टॉल परिसरात अग्निशमन वाहनांची गस्त ठेवण्यात आली असून, फटाके विक्रेत्यांना व नागरिकांना लेखी व मौखिक सूचना देण्यात आल्या आहेत.
अग्निशमन विभागाने नागरिकांना खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
-
फटाके फोडण्याचे ठिकाण: गर्दीच्या भागात, इमारतीजवळ किंवा वाहनाजवळ फटाके फोडू नयेत.
-
वस्त्र: नायलॉन/सिंथेटिक कपड्यांऐवजी सूती कपडे परिधान करावेत.
-
सुरक्षित अंतर: फटाके फोडताना किमान दोन मीटरचे अंतर राखावे. ज्वलनशील वस्तू, गॅस सिलिंडर किंवा विद्युत तारांजवळ फटाके फोडणे टाळावे.
-
खबरदारी: फटाका पेटल्यानंतर न फुटल्यास तो पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. पेटलेले दिवे, फटाके किंवा अर्धवट फुटलेले फटाके हाताळताना खबरदारी घ्यावी.
