106
‘प्लास्टिक’ची आहुती द्या, पर्यावरणाची दिवाळी साजरी करा!
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना ‘स्वच्छ आणि आरोग्यदायी’ दिवाळीचा संकल्प करण्याचे कळकळीचे आवाहन
पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २० ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
दिवाळी सणाच्या उत्साहात बाजारपेठा, घरांची सजावट आणि भेटवस्तूंच्या खरेदीने वेग घेतला आहे. मात्र, या आनंदमय वातावरणात प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना यंदा जबाबदारीने सण साजरा करण्याचे महत्त्वाचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार, दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये प्लास्टिक पिशव्या, कप, प्लेट्स, फुगे, सजावटीच्या वस्तू आणि गिफ्ट रॅप्स यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. या सर्व वस्तू वापरानंतर थेट कचऱ्यात जातात आणि पर्यावरणाला मोठी हानी पोहोचवतात.
या वस्तूंचे विघटन होत नसल्याने त्या नाल्यांमध्ये अडथळे निर्माण करतात, ज्यामुळे शहरात प्रदूषण वाढते आणि सार्वजनिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. या धोक्याकडे लक्ष वेधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘पर्यावरणपूरक दिवाळी, स्वच्छ शहराची दिवाळी’ हा संदेश देत विविध जनजागृती उपक्रम राबवत आहे.
प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने विशेष तपासणी पथकेही तयार केली आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना अथवा त्याची विक्री करताना आढळल्यास, संबंधित व्यक्ती किंवा विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
“घरातील स्वच्छतेबरोबरच पर्यावरणाची स्वच्छता राखणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक कापडी, कागदी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पर्यायांचा वापर करून सण साजरा करावा. प्लास्टिकमुक्त दिवाळी ही फक्त मोहीम नसून प्रत्येक नागरिकांनी देखील हा संकल्प पाळायला हवा.”
— विजयकुमार खोराटे (अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
“नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीवेळी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करावा, त्याचबरोबर नैसर्गिक व पुनर्वापरयोग्य सजावट करावी. तसेच, प्लास्टिक वस्तूंच्या ऐवजी मातीच्या किंवा धातूच्या दिव्यांना प्राधान्य देऊन पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी.”
— सचिन पवार (उप आयुक्त आरोग्य, पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
