news
Home अमरावती शिवप्रताप दिनी ऐतिहासिक कामगिरी! – अमृत संस्थेचे विजय जोशी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गिनीज बुकमध्ये नोंद

शिवप्रताप दिनी ऐतिहासिक कामगिरी! – अमृत संस्थेचे विजय जोशी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गिनीज बुकमध्ये नोंद

अमेरिकेपासून आखाती देशांपर्यंत शिवप्रेमींचा सहभाग; गिनीज रेकॉर्डचे पंच प्रवीण पटेल यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

 


 

‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’चा विश्वविक्रम; देश-विदेशातील शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १३ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेने आयोजित केलेल्या ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ या उपक्रमाने ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) आपले नाव नोंदविले आहे. हा उपक्रम आता ‘मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम’ या श्रेणीतील विश्वविक्रम म्हणून ओळखला जाईल.

शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी अमृतच्या पुणे येथील मुख्यालयात विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी प्रवीण पटेल यांच्या हस्ते  अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

 

हा उपक्रम केवळ एक शासकीय कार्यक्रम न राहता, त्याला एका लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. याचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि संस्कृती रक्षण या गुणांना उजाळा देत समाजमन घडविणे आणि महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हा होता. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती अंगणात, सोसायटीत किंवा शाळेत तयार करून, त्यासोबतचा फोटो ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ च्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विजय जोशी यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील राज्ये, अमेरिका, इंग्लंड आणि आखाती देशातूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे प्रतिकृतींच्या फोटोंची संख्या विक्रमी झाली.

 

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पंच प्रवीण पटेल यांनी यावेळी सांगितले की, योग्य चित्रे निवडणे, तसेच अस्पष्ट व दुबार चित्रे बाद करणे अशा अनेक दिवसांच्या किचकट तपासणी प्रक्रियेनंतर हा विश्वविक्रम प्रस्थापित होऊ शकला.

विजय जोशी यांनी या यशाबद्दल सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक नेतृत्व, दुर्गप्रेमी, विद्यार्थी, अमृत कर्मचारी आणि सर्व शिवप्रेमींचे आभार मानले. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकास मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र लवकरच मिळणार आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!