पिंपरी-चिंचवड महापालिका रोजगार मेळाव्याला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ५० हून अधिक कंपन्या, १ हजारावर संधी
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीएचडीसी’ उपक्रमांतर्गत यशस्वी आयोजन; अनेक उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २९ नोव्हेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) या महापालिका उपक्रमांतर्गत हा मेळावा यशस्वीरित्या पार पडला.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला, ज्यामुळे १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या.

या मेळाव्यात १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा ते ग्रॅज्युएट अशा सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामध्ये फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक कंपन्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करत त्यांना तात्काळ नियुक्तीपत्रे (Appointment Letters) देखील दिले.

मेळाव्याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “शहरातील सुशिक्षित तरुण-तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबवणे हे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उद्दिष्ट आहे. आजच्या रोजगार मेळाव्यात तरुणांचा उत्साहपूर्ण सहभाग आणि कंपन्यांकडून मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद अत्यंत समाधान देणारा आहे. पुढील काळातही अशा संधी अधिक व्यापक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या आमच्या योजना आहेत.”
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सांगितले, “या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या आणि तरुण एकाच व्यासपीठावर येऊन परस्पर संवाद साधू शकले, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. भविष्यातही आम्ही समाजहितार्थ अशा उपक्रमांना सतत पाठबळ देत राहू.”
उपायुक्त ममता शिंदे म्हणाल्या, “या रोजगार मेळाव्याने कंपन्या आणि तरुणांमधील दुवा मजबूत करून तरुणांना एक परिणामकारक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अनेक तरुणांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हेच आमच्या कार्याचे खरे बलस्थान आहे.”
या मेळाव्याला महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे विजय प्रकाश, जय देवकर, लखन रोकडे, काकासाहेब भुरे, रुपेश कुऱ्हाडे आदींनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि त्यांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डेटा विश्लेषण करून महापालिकेकडून सीएचडीसी प्रकल्प कार्यरत असून, त्या अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
