आदिवासी विकास महामंडळाकडून धारणी-चिखलदरा तालुक्यांत ८८८ क्विंटल मका खरेदी
खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये हमी भावाने धान्य खरेदी; आतापर्यंत एक हजार शेतकऱ्यांची नोंदणी
धारणी, चिखलदरा, दि. १० डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी कार्यालयामार्फत खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये शासनाच्या किंमत समर्थन योजनेंतर्गत (Price Support Scheme) धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एफएक्यू (FAQ) दर्जाचे ज्वारी, बाजरी, मका, रागी ही भरडधान्ये खरेदी करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत ८८८ क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.
-
हमी भावाने धान्य खरेदीसाठी नोंदणी कालावधी हा दि. १५ डिसेंबर २०२५ पर्यंत राहणार आहे.
-
खरेदी प्रक्रिया दि. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
महामंडळाकडे आतापर्यंत एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून, त्यापैकी २४८ शेतकऱ्यांकडून ८८८.४० क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात धारणी उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत खालील ठिकाणी खरेदी केंद्र सुरू आहेत:
-
धारणी अंतर्गत: बैरागड, सावलिखेडा, साद्राबाडी, चाकर्दा, हरीसाल आणि धारणी.
-
चिखलदरा अंतर्गत: चुरणी आणि गोलखेडा बाजार.
प्रादेशिक व्यवस्थापक संतोष आमटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, खरेदी केंद्रावर धान्य आणण्यापूर्वी ते व्यवस्थितरीत्या वाळवून, स्वच्छ करून आणावे, तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
