टाळ–मृदुंगाच्या गजरात घुमला लोकशाहीचा जागर! चिखलीत विद्यार्थ्यांची ‘मतदानाची दिंडी’
“मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो”; चिखली संतपीठ शाळेचा मतदार जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम
पिंपरी प्रतिनिधी शाम सोनवणे, दि. २८ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२५): “मतदार राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणा, टाळ–मृदुंगाचा गजर आणि वारकरी वेशभूषेतील चिमुकल्यांचा उत्साह… अशा भारावलेल्या वातावरणात चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ परिसरात आज ‘मतदानाची दिंडी’ काढण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांना जागृत करण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ (SVEEP) कार्यक्रमांतर्गत ही मोहीम राबवण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत संतपीठ शाळेच्या परिसरातून ही दिंडी निघाली.
-
सहभाग: महापुरुषांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, वारकरी परंपरेनुसार टाळ-वीणा घेतलेले चिमुकले आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते.
-
मार्ग: ही दिंडी संतपीठ परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि कॉलनींमधून मार्गस्थ झाली, जिथे विद्यार्थ्यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या:
“लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग आवश्यक आहे. मुले जसा खाऊसाठी पालकांकडे हट्ट धरतात, तसाच हट्ट शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी पालकांना मतदानाला नेण्यासाठी करावा. मतदानाचा दिवस ही सुट्टी नसून ती एक जबाबदारी आहे.”
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संतपीठ शाळेतील विद्यार्थिनी ह.भ.प. श्रुती रोडे हिने कीर्तनाच्या माध्यमातून लोकशाहीतील मतदानाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी ‘हक्क आपल्या मतदानाचा’ हे प्रेरणादायी गीत सादर केले, ज्याला पखवाज आणि तबल्याची साथ देण्यात आली. यावेळी मतदान जनजागृतीपर पथनाट्यही सादर करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना पत्रांचे वाटप करण्यात आले. या पत्रांच्या माध्यमातून मुले आपल्या पालकांना मतदानासाठी भावनिक साद घालणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी प्रफुल्ल पुराणिक यांनी सर्वांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची आणि निर्भयपणे मतदान करण्याची शपथ दिली.
या कार्यक्रमासाठी उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्राचार्य ज्ञानेश्वर गाडगे आणि मुख्याध्यापिका स्नेहल पगार उपस्थित होते.
© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

