मुर्तीजापूरमध्ये भाजीपाला विक्रेत्या महिलेचा विनयभंग! कार दुकानावरून नेल्याचे सांगितल्याने संताप; चव्हाण बंधूंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २४ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुर्तीजापूर/अकोला : बाजारात भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना मुर्तीजापूर तालुक्यातील मुंगशी येथे घडली आहे. गाडीचे चाक दुकानावरून नेल्याचा जाब विचारल्याने आरोपींनी महिलेला जमिनीवर पाडून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुर्तीजापूर ग्रामीण पोलिसांनी दोन नामजद आरोपींसह एकूण चार जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी फिर्यादी महिला, तिचे पती आणि कामावरील मुलगा हे मुंगशी येथील बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावून बसले होते. सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गावातून एक पांढऱ्या रंगाची कार आली. ही कार फिर्यादीच्या दुकानावरून जात असताना महिलेने चालकाला (अविनाश चव्हाण) हटकले आणि “जरा थांब, दुकानावरून चाक जात आहे,” असे सांगितले.
या साध्या बोलण्याचा राग आल्याने आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. सर्व आरोपींनी संगणमत करून महिलेला लोटालोट केली आणि जमिनीवर पाडले. इतकेच नव्हे तर, पीडितेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्याशी गैरवर्तन करून “तुला मारून टाकील,” अशी धमकीही दिली.
पीडितेने आज, २४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तिच्या जबाबी रिपोर्ट आणि मेडिकल सर्टिफिकेटच्या (वैद्यकीय अहवाल) आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-
आरोपी: १) अविनाश चव्हाण, २) आकाश चव्हाण आणि इतर दोन अनोळखी इसम (सर्व रा. मुंगशी).
-
दाखल कलमे: भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ (विनयभंग), २९६ (अश्लील कृत्य/शिवीगाळ), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३५२ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुर्तीजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या म.स.फौ. शकुंतला सदार यांनी हा गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार गणेश गावंडे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
भरबाजारात एका कष्टकरी महिलेवर झालेल्या या हल्ल्यामुळे मुंगशी परिसरात खळबळ उडाली असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
