मेळघाटात होळीचा सण होणार गोड! मनरेगा मजुरांच्या खात्यात २८ कोटी जमा; रखडलेल्या मजुरीचा प्रश्न राज्य शासनाकडून मार्गी
अमरावती, २५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती : होळीच्या सणापूर्वी मेळघाटातील आदिवासी मजुरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) काम करणाऱ्या मजुरांसाठी राज्य शासनाने ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यापैकी २८ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी एकट्या मेळघाटसाठी आज उपलब्ध झाला आहे. ही रक्कम थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याने मजुरांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अशा वेळी मजुरीची रक्कम वेळेवर मिळाल्याने हजारो हातांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
मेळघाटातील अकुशल मजुरांना रोजगार दिला जातो, मात्र वाढीव ‘लेबर बजेट’च्या मान्यतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने काही काळ मजुरी देण्यास विलंब झाला होता.
-
तप्तर कार्यवाही: मजुरांची अडचण ओळखून मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांनी याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला.
-
बजेटमध्ये वाढ: केंद्र शासनाने १९ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्याच्या १३ कोटी मनुष्यदिवसांच्या लेबर बजेटमध्ये सुधारणा करून ते १६ कोटी करण्यास मान्यता दिली आहे.
मजुरीची देयके कोषागाराकडे सादर केल्यानंतर आज तातडीने मजुरांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात आली. यामुळे मजुरांना आता मध्यस्थांची गरज उरलेली नाही. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मार्च अखेरपर्यंत मजुरांना नियमित रोजगार आणि वेळेत मजुरी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
होळीच्या तोंडावर मजुरी मिळाल्याने आदिवासी बांधवांमध्ये राज्य शासनाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या मजुरांसाठी हा निधी संजीवनी ठरणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
