‘स्वामी विवेकानंदांच्या विचारांनीच संकटावर मात करण्याची मिळाली प्रेरणा!’; पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचे ‘युवोत्सव’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
आकुर्डी : “जीवनात आलेले प्रत्येक संकट हे संधी असते. अपंगत्वावर मात करून देशासाठी ४७४ सुवर्णपदके जिंकण्याची ताकद मला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून मिळाली. आजच्या युवा पिढीने अशा महान महापुरुषांचे चरित्र अभ्यासले पाहिजे,” असे प्रेरणादायी विचार पॅरा ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) येथे आयोजित ११ व्या “युवोत्सव” या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनप्रवासावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यांचे ओएसडी कपिल मिसाळ यांनी पेटकर यांच्या संघर्षाची माहिती देताना सांगितले की, ऑलिम्पिकमधील कुस्ती, धनुर्विद्या, हॉकी आणि ॲथलेटिक्स अशा विविध खेळांत सहभागी होऊन त्यांनी एकूण ४७६ पदके जिंकली, ज्यात ४७४ सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्यांची ही जिद्द पाहून उपस्थित विद्यार्थी भारावून गेले होते.
संस्थेच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर यांनी स्वागत प्रास्ताविकात सांगितले की, पेटकर यांचा प्रवास हा यशाचा ‘मॅनेजमेंट मंत्र’ आहे. जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा प्रयत्नांनी दुसरा यशाचा मार्ग कसा शोधावा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
यावर्षीच्या स्पर्धेत अहिल्यानगर, बारामती, पुणे शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने संघ सहभागी झाले आहेत:
-
फुटबॉल: ३४ संघ
-
व्हॉलीबॉल: २४ संघ
-
बॉक्स क्रिकेट: मुले (२० संघ) आणि मुली (१२ संघ)
-
आयपीएल ऑक्शन: १० संघ
या उपक्रमाला लिबास कलेक्शन, गगनगिरी फूड्स, रेड बुल, याकुल्ट, व्ही लुक अप अशा ९ प्रायोजकांचे सहकार्य लाभले आहे.
यावेळी शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे, प्रा. स्वप्निल सोनकांबळे, समन्वयक डॉ. अमरीश पद्मा, डॉ. ऋषिकेश कुमार आणि पूर्वा साने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या देशमुख यांनी केले तर आभार रिया बन्सल यांनी मानले. प्रशांत सायस, सिद्धेश जामोडे, वैभव वाघरे यांसह विद्यार्थी प्रतिनिधींनी आयोजनात पुढाकार घेतला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कुलपती हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.


