news
Home पिंपरी चिंचवड “प्रशासन झोपेत होते का?” बोगस पत्रांमुळे सुशिक्षित बेरोजगारांची मोठी दिशाभूल; रॅकेटचा शोध घेऊन फौजदारी कारवाईची मागणी

“प्रशासन झोपेत होते का?” बोगस पत्रांमुळे सुशिक्षित बेरोजगारांची मोठी दिशाभूल; रॅकेटचा शोध घेऊन फौजदारी कारवाईची मागणी

सहआयुक्त मनोज लोणकर यांची सारवासारव; अधिकृत संकेतस्थळावरच माहिती घेण्याचे आवाहन, मात्र सायबर सुरक्षा आणि गोपनीयतेवर नागरिकांचा संताप. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

थेट आयुक्तांची बनावट सही! महापालिकेत ‘बोगस’ भरती पत्राचा सुळसुळाट; फसवणुकीनंतर प्रशासनाला जाग, भोंगळ कारभार चव्हाट्यावर


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात सध्या एका बनावट पत्राने मोठी खळबळ उडवून दिली आहे. चक्क महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचा बनावट वापर करून नोकरभरतीचे नियुक्तीपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, थेट आयुक्तांची सही असलेले बनावट पत्र सार्वजनिक होतेच कसे? असा संतप्त सवाल सुशिक्षित बेरोजगार आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर महापालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी माहिती वाऱ्यासारखी पसरत आहे. केवळ माहितीच नव्हे, तर उमेदवारांची कथित निवड यादी आणि आयुक्तांच्या सहीनिशी नियुक्तीपत्रे देखील डिजिटल स्वरूपात फिरत आहेत. यामुळे अनेक तरुणांची दिशाभूल झाली असून, फसवणुकीची शक्यता बळावली आहे.

हे बनावट पत्र सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर कुठे प्रशासन विभागाला जाग आली आहे. यावर स्पष्टीकरण देताना प्रशासनाने “सध्या कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही” अशी माहिती दिली. मात्र, इतका गंभीर प्रकार घडेपर्यंत प्रशासन झोपेत होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बनावट पत्रांमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाने या प्रकरणावर सारवासारव सुरू केली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. बनावट जाहिरातींवर विश्वास ठेवू नका,” असे प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

“भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर (www.pcmcindia.gov.in) भेट देऊनच खातरजमा करावी.”

मनोज लोणकर, सहआयुक्त, प्रशासन विभाग.

थेट आयुक्तांची स्वाक्षरी बनावट पद्धतीने वापरणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!