सांगवीत ‘पवनाथडी’चा थाट! आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन; महिला सक्षमीकरणासह डिजिटल व्यवहारांवर भर, पहिल्याच दिवशी नागरिकांची तुफान गर्दी
पिंपरी प्रतिनिधी आकाश कांबळे, २६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक आणि आर्थिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ‘पवनाथडी’ जत्रेचे सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर दिमाखात उद्घाटन झाले. चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. “महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासोबतच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर महापालिकेचा विशेष भर आहे,” असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी यावेळी केले.
२६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत चालणाऱ्या या जत्रेच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवडकरांनी खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
उद्घाटनपर भाषणात आमदार शंकर जगताप यांनी महिला बचत गटांना आधुनिकतेची कास धरण्याचे आवाहन केले. “स्टॉलधारक महिलांनी आपला व्यवहार डिजिटल पद्धतीने करावा, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. भविष्यात शहरात महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासाठी महापालिका निश्चितच पुढाकार घेईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
-
प्रमुख उपस्थिती: उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे.
-
नगरसदस्य व मान्यवर: अभिषेक बारणे, शाम जगताप, कुणाल व्हावळकर, बाबासाहेब त्रिभुवन, संजय काटे, माजी महापौर शकुंतला धराडे, महापौर पत्नी श्रद्धा लांडगे आणि अनेक नगरसेवक-नगरसेविका.
-
प्रशासन: अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, सीताराम बहुरे, संदीप खोत व अर्चना केरूरे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ममता शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. राणी पठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यंदाच्या जत्रेत ८०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, गृहपयोगी साधने आणि अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची चव जपणारे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. उद्घाटनानंतर सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने नागरिकांची मने जिंकली.

-
कालावधी: १ मार्च २०२६ पर्यंत.
-
वेळ: सकाळी १० ते रात्री १० (सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ वा.)
-
प्रवेश: सर्वांसाठी विनामूल्य.
सांगवी परिसरातील या महोत्सवामुळे महिला उद्योजिकतेला मोठे बळ मिळत असून, पुढील चार दिवस येथे खरेदीची आणि मनोरंजनाची मोठी पर्वणी असणार आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

