मैदानावरही ‘पिंपरी-चिंचवड’चाच डंका! पुणे पोलीस संघाचा धुव्वा उडवत महापालिकेने पटकावले विजेतेपद; सलग १० वर्षे अजिंक्य राहण्याचा ऐतिहासिक विक्रम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २६ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय कामासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली हुकूमत सिद्ध केली आहे. पुणे आंतर कचेरी असोसिएशनतर्फे आयोजित प्रतिष्ठेच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत महापालिकेच्या संघाने सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद पटकावून विजयाचा ‘दशका’ पूर्ण केला आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महापालिकेने आपली विजयी परंपरा कायम राखली.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका ‘अ’ संघाने आपल्या जबरदस्त कौशल्याच्या जोरावर पुणे शहर पोलीस संघाचा २-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयामुळे महापालिकेच्या क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. महापालिकेच्या ‘ब’ संघानेही या स्पर्धेत आपली चमक दाखवत चतुर्थ क्रमांक पटकावला.
या यशामध्ये महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. बांधकाम, पर्यावरण, अग्निशामक, सुरक्षा, पाणीपुरवठा आणि क्रीडा अशा विविध विभागांतील खेळाडू या संघात सहभागी होते.
-
विजेत्या संघाचे शिलेदार: कर्णधार सुहास नाईक, उपकर्णधार दशरथ वाघोले, सोमनाथ वीर, विजय गांगुर्डे, अजय घोगरे, संस्कार चव्हाण आणि अंकुश लोहकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
-
ब संघाचे खेळाडू: हरिभाऊ साबळे, सोमनाथ मोरे, राजवैभव महजराव, हर्षद कदम आणि घनश्याम कदम यांनी उल्लेखनीय खेळ केला.
क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांचे मार्गदर्शन या विजयासाठी निर्णायक ठरले.
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दोन्ही संघांनी दाखवलेली जिद्द आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सलग दहाव्या वर्षी अजिंक्यपद मिळवणे ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे.”
— रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड.
“कर्मचारी केवळ प्रशासकीय कामातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट आहेत, हे या विजयाने सिद्ध केले. ही सातत्यपूर्ण जिंकण्याची परंपरा कष्टाचे फळ आहे.”
— विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त.
सलग दहा वर्षे विजेतेपद राखणे ही एक मोठी कामगिरी मानली जात असून, शहरातील क्रीडाप्रेमींकडून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

