news
Home पिंपरी चिंचवड पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा आकुर्डीत नागरी सत्कार; ‘तमाशा-एक सांस्कृतिक लोकचळवळ’ विषयावर गुंजणार विचार

पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा आकुर्डीत नागरी सत्कार; ‘तमाशा-एक सांस्कृतिक लोकचळवळ’ विषयावर गुंजणार विचार

मराठी भाषेचे वैभव साजरे करण्यासाठी महापालिका सज्ज; २७ फेब्रुवारीला 'मोरे' प्रेक्षागृहात लोककला, साहित्य आणि संगीताचा त्रिवेणी संगम, नामवंत कलावंतांची मांदियाळी. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मराठी भाषेचा जयघोष! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळा; पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा नागरी सन्मान व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, २५ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचे वैभव साजरे करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापालिकेच्या वतीने श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय (भोसरी) आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय (चिंचवड) यांच्या सहकार्याने २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

 

या सोहळ्याचे उद्घाटन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे.

 

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लोककला तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा होणारा विशेष नागरी सन्मान. सन्मानानंतर खेडकर हे “तमाशा – मराठी भाषा संवर्धन करणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ” या विषयावर आपले विचार मांडतील.

दिवसभर चालणाऱ्या या सोहळ्यात रसिकांसाठी कार्यक्रमांची मोठी मांदियाळी आहे:

माय मराठीची गौरवगाथा: दुपारी १२ वाजता संदेश विठ्ठल उमप आणि शाहीर पृथ्वीराज माळी यांचा सांस्कृतिक आविष्कार रंगणार आहे.

कविसंमेलन: दुपारी ३ वाजता राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक निमंत्रित कवींचे संमेलन होईल.

परिसंवाद: दुपारी ४ वाजता ‘अभिजात मराठी भाषेचे वैभव’ या विषयावर अरुण बोऱ्हाडे, प्रकाश निर्मल आणि डॉ. धनंजय भिसे हे मान्यवर चर्चा करतील.

संगीत संध्या: सायंकाळी ६ वाजता विजय सरतापे आणि सहकाऱ्यांचा “आवाज लोकगीतांचा… गंध मराठी मातीचा…” हा बहारदार कार्यक्रम पार पडेल.

मुख्य सोहळ्यापूर्वी बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ऑटो क्लस्टर सभागृहात प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर प्रा. सुशोभन पाटणकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

 

या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. नीलम गोऱ्हे, अण्णा बनसोडे, माधुरी मिसाळ यांसह अनेक खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

 

नागरिकांसाठी आवाहन:मराठी भाषेचा हा जागर अनुभवण्यासाठी सर्व कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे

 


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!