20
KEM च्या माजी विभागप्रमुख डॉ. लोपा मेहता यांचे देहावसान; ‘लिव्हिंग विल’ अन् मृत्यूवरील संशोधनाने वैद्यकीय क्षेत्रात विचारमंथन!
मुंबई/पिंपरी प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
मुंबई: मुंबईतील नामांकित जी. एस. मेडिकल कॉलेज आणि के.इ.एम. (KEM) रुग्णालयाच्या ॲनाटॉमी (शरीररचना शास्त्र) विभागाच्या माजी प्रमुख आणि ज्येष्ठ तज्ज्ञ प्रो. डॉ. लोपा मेहता यांचे देहावसान झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ ज्ञानदान करणाऱ्या डॉ. मेहता यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेले ‘लिव्हिंग विल’ (Living Will – इच्छापत्र) आणि मृत्यू या संकल्पनेवर मांडलेले वैज्ञानिक व आध्यात्मिक विचार सध्या संपूर्ण वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात मोठ्या विचारमंथनाला कारणीभूत ठरत आहेत.
वयाच्या ७८ व्या वर्षी डॉ. लोपा मेहता यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपले इच्छापत्र तयार केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते:
“जेव्हा माझे शरीर साथ देणे बंद करेल आणि प्रकृतीत सुधारणेची कोणतीही शक्यता उरणार नाही, तेव्हा माझ्यावर कोणतेही अनावश्यक वैद्यकीय उपचार केले जाऊ नयेत. ना व्हेंटिलेटर, ना नळ्यांची यंत्रणा आणि ना रुग्णालयाची व्यर्थ धावपळ! माझ्या अंतिम क्षणी केवळ शांतता असावी — जिथे उपचारांच्या हट्टापेक्षा समंजसपणाला प्राधान्य दिले जाईल.”
त्यांनी आपल्या इच्छेत विशेष नमूद केले होते की, वेळ आल्यास त्यांना के.इ.एम. (KEM) रुग्णालयात नेण्यात यावे; जिथे उपचारांच्या नावाखाली कोणताही दीर्घकाळ त्रास दिला जाणार नाही आणि शरीराला रोखून न ठेवता शांततेने जाऊ दिले जाईल.
डॉ. लोपा यांनी केवळ हे इच्छापत्रच लिहिले नाही, तर मृत्यूबद्दल एक सखोल संशोधन-पत्रिका (Research Paper) प्रकाशित केली होती. आधुनिक वैद्यकशास्त्र नेहमी मृत्यूला एखाद्या आजाराचा परिणाम मानते आणि उपचारांनी मृत्यू टाळता येतो असा आग्रह धरते. परंतु डॉ. मेहता यांनी या सिद्धांताला छेद देत “मृत्यू ही एक नैसर्गिक, निश्चित आणि जैविक प्रक्रिया (Biological Process) आहे” असे स्पष्ट केले.
त्यांच्या संशोधनातील प्रमुख मुद्दे शरीर हे कायम चालणारे मशीन नसून ती एक मर्यादित यंत्रणा आहे. मन, बुद्धी, स्मृती आणि चेतना यांच्या मिलनातून सूक्ष्म शरीराद्वारे जीवन-ऊर्जा मिळतीय. ही ऊर्जा अमर्याद नसून तिची एक निश्चित पातळी असते. जेव्हा शरीरातील ही ऊर्जा संपते, तेव्हा सूक्ष्म शरीर देहापासून वेगळे होते आणि ‘प्राण’ जातात. ही प्रक्रिया कोणत्याही आजाराशी किंवा चुकीशी जोडलेली नसून ती गर्भाशयात सुरू होऊन मृत्यूपर्यंत पोहोचणारी शरीराची अंतस्थ लय आहे.
डॉ. लोपा मेहता यांच्या या विचारांमुळे आज वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांकडून असलेल्या अपेक्षा, रुग्णालयांचे व्यावसायिक धोरण आणि कुटुंबातील भावना व तर्क यावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
“आपण मृत्यूला शांत आणि नैसर्गिक प्रक्रिया मानण्यास शिकलो, तर मृत्यूची भीती कमी होईल आणि डॉक्टरांकडून आपल्या अपेक्षा अधिक वास्तववादी होतील. मृत्यूशी लढणे थांबवून त्यापूर्वी जीवनाची योग्य तयारी केली पाहिजे आणि तो क्षण आल्यास शांततेने व आदराने त्याला सामोरे गेले पाहिजे,” हा मोलाचा संदेश डॉ. लोपा मेहता यांच्या जीवनप्रवासातून आणि संशोधनातून समाजाला मिळाला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
