64
सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’चा दणदणाट; शिरगाव-परंदवडी पोलिसांकडून २ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल, लाखो रुपयांचे साऊंड सिस्टीम जप्त!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
परंदवडी: गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून उच्च क्षमतेच्या डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साधनांवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करत सातव्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेल्या तीव्रतेपेक्षा जास्त आवाजात ध्वनीक्षेपक चालवणाऱ्या चांदखेड येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि ओझर्डे येथील शिवतेज मित्र मंडळ या दोन अतिउत्साही सार्वजनिक गणेश मंडळांवर शिरगाव-परंदवडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पार पडले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी दोन्ही मंडळांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७०, २९३ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३(आय)(आर)(३), १३१, ३६/१३४, ३७/१३५, ३८/१३६ अन्वये २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ०८ डी.जे. साऊंड सिस्टीम स्पीकर, ०२ डीजे मिक्सर, ०२ ॲम्प्लिफायर मशीन आणि ०१ वाहन असा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेशोत्सवापूर्वी शिरगाव-परंदवडी पोलिसांकडून हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच डी.जे. चालक व मालकांशी मिटींग घेऊन ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाच्या नियमांची स्पष्ट जाणीव करून देण्यात आली होती. नियम तोडल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा लेखी सूचनेद्वारे देण्यात आला होता. मात्र, तरीही आदेशाचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आव्हाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (परी. ०४) श्वेता खेडकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (देहूरोड) प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, अशोक केंद्रे, महेंद्र सपकाळ आणि अंमलदार दिनकर भुजबळ, प्रशांत भोसले, दत्तप्रसाद चौधरी, रितेश कोळी, काजल आघाव, सुरेश परदेशी, संतोष तांबे, सागर कोळी, लक्ष्मण हेमाडे यांच्या पथकाने केली.
गणेशोत्सव २०२६ च्या उर्वरित कालावधीत आणि मुख्य विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणत्याही गणेश मंडळाने उच्च आवाजाची साऊंड सिस्टीम वापरू नये. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पूर्वसूचना न देता कठोर कारवाई करून साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी मंडळाचे पदाधिकारी व आयोजकांची असेल, असा इशारा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी दिला आहे.
© २०२६ मॅक्स मंथन Daily News. सर्व हक्क राखीव.
