73
गणेशोत्सवाच्या जागतिक मोहिमेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी पदी नियुक्ती!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी आकाश कांबळे, दि. २२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अन् वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच या उत्सवाशी संबंधित लोककला, परंपरा, संस्कृती व सामाजिक समन्वयाचे डिजिटल दस्तऐवजीकरण (Documentation) करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात या महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी उपक्रमाची धुरा सांभाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यक्षम जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या अभ्यासू, कौशल्याधिष्ठित आणि गतिमान कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या खांद्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सवाचे ब्रँडिंग, प्रचार-प्रसिद्धी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी पुराणिक यांच्या नेतृत्वात विशेष पथक कार्यरत झाले आहे.
राज्य शासनाने गणेशोत्सवातील कला, हस्तकला, आकर्षक सजावट, कौटुंबिक प्रथा, खाद्यपरंपरा आणि स्थानिक कलावंतांची माहिती जगभरापर्यंत पोहोचवण्यासाठी Bappa.org हे अधिकृत डिजिटल व्यासपीठ तयार केले आहे. या व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक व गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या उत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ व माहिती नोंदवावी, यासाठी प्रफुल्ल पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
प्रफुल्ल पुराणिक यांच्या समन्वयाने महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण सोसायट्या (Housing Societies), निवासी कल्याणकारी संघटना (RWA) आणि सामाजिक संस्थांना या मोहिमेत जोडण्यात येत आहे. Bappa.org च्या प्रसारासाठी डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया, माहितीपत्रके, आकर्षक स्टँडीज आणि क्यूआर कोड (QR Code) प्रणालीचा प्रभावी वापर करून ही माहिती थेट नागरिकांच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रशासकीय प्रसिद्धीची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या प्रफुल्ल पुराणिक यांच्या नियुक्तीमुळे या जागतिक मोहिमेला मोठा वेग मिळणार आहे. शहराची सांस्कृतिक ओळख जागतिक नकाशावर कोरण्याच्या या मोहिमेत पिंपरी-चिंचवडकर नागरिक, सर्व गणेशोत्सव मंडळे आणि गृहनिर्माण सोसायट्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
