67
सांगवीतील पोस्ट ऑफिस दापोडीत हलवल्याने सांगवीकरांचे मोठे हाल; पुराच्या पाण्यामुळे प्रशासन हतबल!
पिंपरी/सांगवी, प्रतिनिधी बालाजी नवले दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
पिंपरी चिंचवड: सांगवी परिसरात नुकत्याच आलेल्या नदीच्या पुराचे पाणी सांगवी येथील पोस्ट ऑफिसमध्ये शिरल्यामुळे प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून हे कार्यालय मुंबई-पुणे महामार्गावरील दापोडी येथे तात्पुरते स्थलांतरित केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असला, तरी यामुळे सांगवीतील ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य खातेदारांची प्रचंड गैरसोय होत असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे ज्येष्ठ नागरिक सुनील मधुकर पोखरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून सांगवीतच तत्काळ नवीन व कायमस्वरूपी पोस्ट ऑफिस सुरू करण्याची मागणी केली आहे.
मुसळधार पावसामुळे पवना व मुळा नदीला आलेल्या पुराचे पाणी सांगवीतील पोस्ट ऑफिसमध्ये शिरले. त्यामुळे कार्यालयातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे, दस्तावेज आणि कार्यालयीन साहित्य पाण्याने भिजले. नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
ज्येष्ठ नागरिक सुनील मधुकर पोखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार-पाच वर्षांपूर्वी सांगवीतील पोस्ट ऑफिस गावठाणातील महादेव मंदिराजवळ होते. त्यानंतर ते कुंभारवाड्यातील मुख्य रस्त्यावर हलवण्यात आले. २०२४ च्या महापुरातही दोन ते तीन दिवस हे पोस्ट ऑफिस बंद होते आणि तेव्हाही अनेक कागदपत्रे भिजली होती. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे कार्यालयासाठी सुरक्षित जागेची गरज स्पष्ट झाली आहे.
सांगवीची लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. त्या तुलनेत सध्याची पोस्ट ऑफिसची जागा अत्यंत अपुरी पडत होती. आता हे कार्यालय दापोडी येथे हलवल्यामुळे निवृत्तिवेतन (Pension) काढणे, पासबुक अपडेट करणे किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी वृद्धांना थेट दापोडी गाठावी लागत आहे. वाहतुकीची समस्या आणि वाढते वय यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सामाजिक भान आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत ज्येष्ठ नागरिक सुनील मधुकर पोखरे यांनी प्रशासनाकडे महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. सांगवीत कायमस्वरूपी कार्यालय: सांगवीतील नागरिकांची आणि विशेषतः ज्येष्ठांची सोय लक्षात घेऊन सांगवीतच एखाद्या सुरक्षित आणि प्रशस्त ठिकाणी कायमस्वरूपी पोस्ट ऑफिस सुरू करावे. पुराच्या पाण्याचा धोका नसलेल्या उंचावरील जागेत नव्या इमारतीची व्यवस्था करावी, जेणेकरून नागरिकांची कागदपत्रे आणि आर्थिक दस्तावेज सुरक्षित राहतील. सांगवीतील खातेदारांना दापोडीत जावे लागत असल्याने तिथेही गर्दी होत आहे. त्यामुळे तात्काळ सांगवीतील सेवा पूर्ववत कराव्यात. सुनील पोखरे यांच्या या जागरूक पुढाकारामुळे सांगवीतील हजारो नागरिकांचा प्रश्न चव्हाट्यावर आला असून, टपाल विभागाने व स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा काढून सांगवीकरांना दिलासा द्यावा, अशी तीव्र भावना व्यक्त केली जात आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.
