25
अमरावतीत ‘अभिव्यक्ती’ अभिनय व नाट्यनिर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न! ‘बीइंग आर्टिस्ट अकॅडमी’चा स्तुत्य उपक्रम
अमरावती/पिंपरी, प्रतिनिधी जयकुमार चर्जन दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:
अमरावती: अमरावती येथील अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था संचलित ‘बीइंग आर्टिस्ट अकॅडमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्ट्स’ (Being Artist Academy of Film & Theatre Arts) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘अभिव्यक्ती’ अभिनय तथा नाट्यनिर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा (दि. १६ जुलै ते ५ ऑगस्ट) अत्यंत उत्साहात पार पडली. मर्यादित प्रवेश असलेल्या या विशेष कार्यशाळेत अमरावती जिल्ह्यातील विविध भागांतील हौशी व उदयोन्मुख कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या कालावधीत प्रशिक्षणार्थींना अभिनयाची मूलतत्त्वे, संवादफेक, शरीरभाषा (Body Language), आवाजावरील नियंत्रण, भावाभिव्यक्ती, रंगमंचावरील वावर, पात्रनिर्मिती आणि प्रसंग सादरीकरण याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय कॅमेऱ्यासमोरील अभिनयाची तांत्रिक माहिती, प्रात्यक्षिके, नाट्यखेळ, गटचर्चा आणि प्रत्यक्ष एकांकिका निर्मितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण देण्यात आले.
तसेच, संहितालेखनापासून ते मंचनापर्यंतची संपूर्ण नाट्यनिर्मिती प्रक्रिया, लोकशिक्षण, समाजप्रबोधन, व्यक्तिमत्त्व विकास आणि नाट्यक्षेत्रातील करिअरच्या संधी यासोबतच शासनाच्या विविध कला-सांस्कृतिक योजना व अनुदानाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे प्रमुख प्रशिक्षक व संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
“नाटक हे केवळ अभिव्यक्ती किंवा लोकरंजनाचे माध्यम नसून ते व्यक्तीच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे अत्यंत प्रभावी साधन आहे.”
या संपूर्ण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी संस्थेच्या सचिव तथा अकॅडमीच्या संचालिका स्नेहा वासनिक यांनी उत्तमरीत्या सांभाळली.
या कार्यशाळेत संदेश बायस्कर, पवन वाकोडे, अक्षय बकसरे, साक्षी जिभकाटे, विज्ञप्ती पर्वतकर, योगेश लोन्दे, नवीन गुडधे, आराध्य इसळ, सम्यक खडसे, प्रवीण वानखडे आणि श्रुतिका दंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
सहभागी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या दर्जेदार प्रशिक्षण उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. आयोजकांच्या वतीने भविष्यात अधिक व्यापक स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातील, अशी माहिती देण्यात आली.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

