news
Home पिंपरी चिंचवड पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील स्मशानभूमीत चुकीच्या रचनेमुळे अपघात घडण्याचा धोका; स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना दिले निवेदन

स्मशानभूमीच्या चुकीच्या रचनेमुळे अपघाताचा धोका; 'वृक्षमित्र' अरुण पवार यांचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांना निवेदन | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपळे गुरव स्मशानभूमीत रॅम्पऐवजी पायऱ्या करा; ‘वृक्षमित्र’ अरुण पवार यांची महापालिका आयुक्तांकडे आग्रही मागणी!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ९ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव (प्रभाग क्र. २९) येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणानंतर प्रवेशद्वाराजवळील खांदे बदलीच्या ठिकाणी रॅम्प आणि पायऱ्यांच्या चुकीच्या रचनेमुळे पावसाळ्यात व एरवीही नागरिकांचा पाय घसरून गंभीर अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने तात्काळ येथील धोकादायक रॅम्प काढून त्याऐवजी रुंद पायऱ्या कराव्यात, तसेच अरुंद पायऱ्यांच्या बाजूला अ‍ॅम्ब्युलन्स व टेम्पो वाहनांसाठी ये-जा करण्याची सोय करावी, अशी जोरदार मागणी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री (महाराष्ट्र शासन) वृक्षमित्र राज्यस्तरीय पुरस्कार विजेते अरुण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भातील मागणीचे अधिकृत निवेदन महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी स्वीकारले.

अरुण पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महापालिकेने पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण केले खरं, मात्र यामुळे नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी त्रासात अधिकच भर पडली आहे. स्मशानभूमीच्या मुख्य रस्त्याकडील प्रवेशद्वाराची रुंदी साधारण २५ फूट आहे. अंत्ययात्रेदरम्यान नागरिक खांदे बदलीसाठी वट्यावर थांबतात. मात्र, मृतदेह खांद्यावर घेऊन पुढे जाताना तिथे तीव्र उतार असलेला रॅम्प असल्याने पावसाळ्यात व एरवीही चारही खांदेकाऱ्यांचा पाय घसरून मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे तिथे तात्काळ टप्प्याटप्प्याने रुंद पायऱ्या तयार करणे अत्यंत गरजेचे आहे.  सध्या ज्या बाजूला अत्यंत छोट्या व अरुंद पायऱ्या आहेत, तिथली रचना सुधारून अंत्यविधीचे साहित्य किंवा मयत घेऊन येणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्स व टेम्पो वाहनांसाठी सुलभ रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा.

 

अरुण पवार यांनी पुढे स्पष्ट केले की, एखाद्या अंत्यविधीच्या वेळी स्मशानभूमीत साधारण एक ते दीड हजार नागरिकांची मोठी उपस्थिती असते. अशा वेळी किरकोळ चुकीमुळे मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे रॅम्पऐवजी पायऱ्या केल्यास नागरिकांची सुरक्षितता जपता येईल.
“पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीतील या गंभीर आणि संवेदनशील समस्येबाबत गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने या जनहिताच्या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाने स्वतः तात्काळ जागेची पाहणी करून योग्य ती दुरुस्ती करावी.”
— अरुण पवार (राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार विजेते)
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!